जरांगेंना परवानगीशिवाय आंदोलनास मनाई...
मुंबई, ता.26 - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 'चलो मुंबईची' हाक दिली आहे. येत्या 27 ते 29 ऑगस्ट या काळात मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार असा पवित्रा जरांगे यांनी घेतला आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी मुंबईतील मराठा आंदोलनाला हायकोर्टाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.
मुंबईत आंदोलनास न्यायालयाचा नकार ...
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेता पूर्वपरवानगीशिवाय मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करू शकत नाहीत असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. लोकशाहीत असहमतीला स्थान आहे मात्र आंदोलन ठरवलेल्या जागीच करावे लागते असे मत न्यायालयाने व्यक्त केले. जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईची दिनचर्या विस्कळीत होऊ नये म्हणून राज्य सरकार नवी मुंबईतील खारघर येथे पर्यायी जागा देण्याचा विचार करू शकतो असेही न्यायालयाने सूचित केले. सार्वजनिक जागा अनिश्चित काळासाठी अडवता येणार नाही असेही न्यायालय म्हणाले. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक राधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर पार पडली. एमी फाउंडेशन कडून जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
0 Comments