news today, शिवना टाकळी प्रकल्पातून कालव्याला पाणी सोडणार - आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर, ता.14 / प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील शिवनथडी भागातील शेतकऱ्यांसाठी शिवना टाकळी धरणातून उजव्या कालव्याला येत्या एक - दोन दिवसांत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती आ.रमेश पाटील बोरणारे यांनी दिली.
शिवना टाकळी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील गारज, खिर्डी, मालेगाव, मणूर, साळेगाव कन्नड, पोखरी, वाघला, भटाणा, शिवगांव, पाथरी, धोंदलगांव, झोलेगांव, भोकरगाव, बायगांव, जांबरखेडा, लाखणी, मांडकी, भायगांवगंगा, उंदीरवाडी, राहेगाव आदी गावांतील शेतकऱ्यांनी आ.रमेश पाटील बोरणारे यांची भेट घेऊन शिवना टाकळीचे पाणी सोडण्यासंदर्भात निवेदन दिले होते. आ.बोरणारे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वानखेडे यांच्याशी संपर्क साधला व शेतकऱ्यांची सद्याची समस्या लक्षात घेऊन शिवना टाकळी प्रकल्पातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावे अशी सूचना केली. त्यावर कार्यकारी अभियंता वानखेडे यांनी येत्या दोन दिवसांत कालव्याला पाणी सोडणार असल्याचे सांगितले. 

शिवना टाकळी प्रकल्पातून उजव्या व डाव्या कालव्याला पाणी सोडण्याबाबत आ.बोरणारे यांना निवेदन देताना लाभक्षेत्रातील शेतकरी

शिवना टाकळी प्रकल्पाचे उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी गारजसह या भागातील शेतकऱ्यांनी केली होती. या भागामध्ये शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसह शेतात लागवडीसाठी बियाणे, खत अतिशय महागडे घेऊन शेतामध्ये मोठ्याप्रमाणात पैसा खर्च करून मक्का, कपाशी, बाजरी, भुईमूग या पिकांची लागवड केली असून, शेतातील पिके जोमात आहे. मात्र , काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने हाता तोंडाशी आलेला घास हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.  या भागात अतिशय जेमतेम पाऊस पडल्याने हातात येणारे पीक सुकू लागले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या शिवना टाकळी प्रकल्पामध्ये 80 ते 85 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे  प्रकल्पातून उजव्या व डाव्या कॅनलला पाणी सोडल्यास शेतकऱ्यांचे वाया जाणारे पीक शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहे. म्हणून या परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांनी आमदार रमेश पाटील बोरणारे यांची भेट घेऊन लेखी निवेदन देऊन तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती. यावेळी रामहरी जाधव, प्रकाश शिंदे,  सजनराव शिंदे, प्रभाकर जाधव, आर.आर.वाघ , सुरेश पानसरे, अवधूत ठुबे, राधाजी सरोवर , राजाराम चेळेकर , व्यंकटराव जाधव , गोकुळ ढंगारे, सुभाष बारगळ, बाळासाहेब कदम, प्रशांत ठोंबरे, संतोष ठोंबरे, अक्षय कदम, गणेश तुपे, विठ्ठल दरेकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments