news today, जमिनीचा मोबदला थकविल्याने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश

छञपती संभाजीनगर, ता.23 - जिल्हयातील फुलंब्री तालुक्यातील वाकोद प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला थकविल्यामुळे कोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार एक पथक गुरुवारी (ता.21) जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत मोबदला अदा करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीची जप्ती टळली.

लघु पाटबंधारे विभागाने 2006 मध्ये वाकोद मध्यम  प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पासाठी फुलचंद धनावत आणि विठ्ठल.धनावत यांची जमीन संपादीत करण्यात आली होती. त्यांना सुरुवातीला जमिनीचा मोबदला अदा करण्यात आला. त्यानंतर त्यांचा वाढीव मावेजाचा अर्ज मान्य झाला.परंतु वाढीव मावेजाची सुमारे 24 लाख रुपयांची रक्कम 2015 पासून त्यांना मिळाली नाही त्यामुळे त्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानुसार खुर्ची जप्त करण्यासाठी एक पथक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी संबंधितांशी चर्चा करून मोबदला अदा करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्याची विनंती केली.तसेच आठ सप्टेंबरपर्यंत मोबदला अदा करण्याबाबत लेखी पत्रही दिले. त्यानंतर खुर्चीची जप्ती टळली.

Post a Comment

0 Comments