news today, सरकारी कामात अडथळा आणला ; माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा

नागपूर, ता.07 -  छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नागपूर सत्र न्यायालयाने बुधवारी (06) एक वर्ष कारावास तसेच वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. जिल्हा न्यायधीश आर जे.राय यांनी हा निकाल दिला.


शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे 2014 मध्ये नागपूर दौऱ्यावर आले होते. वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात होते.मात्र, त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी नकार दिल्यानंतर पोलीस आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात वाद झाला होता.विशेष सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक पराग जाधव यांनी त्यांना खोलीत प्रवेश करण्यास रोखले असता आ.हर्घषवर्धन जाधव यांनी पोलिस निरीक्षक पराग जाधव यांना चापट मारली.या घटनेनंतर पोलिसांनी त्यांच्यावर भा.द.वी. कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून एक वर्ष कारावास व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणातील सर्व पक्षकार आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यामध्ये हर्षवर्धन जाधव हे दोषी आढळले. सरकारच्यावतीने ॲड. चारुशीला पौनीकर यांनी, तर हर्षवर्धन जाधव यांच्यातर्फे ॲड. प्रकाश जयस्वाल यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments