फर्निचर गोदामाला लागलेल्या आगीत मृत्यू पावलेले मयूर रासने त्यांची पत्नी पायल, मुले अंश व चैतन्य
मयूर अरुण रासने (वय 36 वर्ष), त्यांची पत्नी पायल (वय 30 वर्ष),कदोन लहान मुले अंश (वय 10 वर्ष) व चैतन्य (वय 6 वर्ष) आणि आजी सिंधुताई चंद्रकांत रासने (वय 85 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत, तर यश किरण रासने (वय 25 वर्ष) जखमी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. जखमी यश रासने यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाचही जणांचा भाजून व गुदमरून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासा फाट्यापासून सुमारे एक ते दीड कि.मी. आतमध्ये ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात ही दुर्घटना घडली. या भागातील अहिल्यानगर वसाहतीत रासने यांचे कालिका फर्निचर या नावाचे दुकान आहे. खाली दुकान व वरच्या मजल्यावर रासने कुटुंबीय राहतात.तर पाठीमागे फर्निचर चे गोदाम आहे.या गोदामाला मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली तेव्हा सर्वजण गाढ झोपेत होते. मात्र लाकडी फर्निचर ,भुसा व फोम यामुळे आगीचा लगेच भडका उडाला आणि ती पसरली. झोपेत असल्यामुळे रासने कुटुंबीयांना आग लागल्याचे समजलेच नाही. रासने कुटुंबातील अरुण. रासने व त्यांची पत्नी नंदा मालेगांव येथे नातेवाईकांकडे गेले होते, त्यामुळे ते बचावले.
आगीची माहिती मिळताच नेवासा पोलीस, नेवासा पंचायत समितीचे अग्निशमन दल, भेंडा येथील ज्ञानेश्वर कारखान्याचे अग्निशमन दल यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. पाचही मृतांवर नेवासा शहरातील अमरधाममध्ये दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments