वैजापूर, ता.14/ प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत अनेक वयोवृद्ध, अपंग, निराधार, परितक्त्या तसेच विधवा लाभार्थ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेले प्रस्ताव मार्गी लावा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे केली. प्रलंबित प्रकरणे जिल्हाधिकाऱ्यांना सांगून लवकरच मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन श्री. पवार यांनी यावेळी शिष्टमंडळास दिले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी.काँग्रसचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके, एल एम.पवार आदी..
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर लाभार्थ्यांमध्ये अनेक जण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले जीवन जगत असून, त्यांना शासनाच्या या योजनांअंतर्गत नियमित आर्थिक सहाय्य मिळणे अत्यावश्यक आहे. प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जे प्रस्ताव नियमात बसत आहे असे प्रस्तावास मंजूर करणे आवश्यक आहे. या संधर्भात उपविभागीय अधिकारी, वैजापूर यांना भेटून दिनांक 28/04/2025 रोजी निवेदन ही दिले होते. परंतु आतापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यासाठी लाभार्थ्यांना न्याय मिळाला म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
श्रावण बाळ व संजय गांधी निराधार या योजनेच्या लाभार्थ्यांची जवळपास तीन हजार प्रकरणे प्रलंबित असून ही प्रकरणे तातडीने मंजूर व्हावी यासाठी तहसीलदार, वैजापूर यांना सूचना देण्यात यावी,जेणेकरून लाभार्थ्यांना न्याय मिळेल व शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनांचा हेतू सफल होईल. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस च्या शिष्टमंडळात माजी सभापती एल एम पवार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बागुल, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सुराशे, जिल्हा सरचिटणीस गणेश पवार आदी उपस्थित होते
0 Comments