वैजापूरात "कन्या सन्मान दिन" कार्यक्रमात झाडाचे रोपटे व शालेय साहित्य देऊन विद्यार्थिनींचा सन्मान
वैजापूर ता.14 / प्रतिनिधी - जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांच्या आदेशानव्ये गुरुवारी (ता.14) वैजापूर शहर व तालुक्यातील अकरा महसूल विभागाच्या मुख्यालयी "कन्या सन्मान दिन" मोठ्या उत्साहात व सामाजिक जाणिवेसह साजरा करण्यात आला आरोग्य विभाग, महिला बाल कल्याण विभाग, ग्रामविकास विभाग, पोलीस विभाग व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 'कन्या सन्मान दिंन' कार्यक्रमात आ.रमेश पाटील बोरणारे यांनी उपस्थित राहून 'एक झाड मुलींच्या नावाने' ही संकल्पना राबवत शालेय विद्यार्थिनीना झाडाचे रोपटे व सावित्रीबाई फुले पुस्तक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला..
वैजापूर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास उपविभाग अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. डी. ढोकणे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन.मोरे, तहसीलदार सुनिल सावंत, गटविकास अधिकारी डॉ.श्रीकृष्ण वेणीकर, नायब तहसीलदार सूरज कुमावत, पोलीस उप निरीक्षक नरोटे, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय भगत, सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. बोरणारे म्हणाले की, प्रत्येक आई-वडिलांसाठी तसेच मुलींसाठी आजचा हा दिवस विशेष आहे. मुलगी ही देवाने दिलेली एक अनमोल भेट आहे. आपल्या संस्कृतीत तिला लक्ष्मीचे रूप मानले जाते. 'पहिली बेटी धनाची पेटी' ही म्हण आजही आपल्याला मुलीच्या महत्त्वाची जाणीव करून देते. याच पार्श्वभूमीवर समाजात मुलगा-मुलगी समानता प्रत्यक्षात यावी हा संदेश देत दरवर्षी "कन्या सन्मान दिला जातो असे सांगून मुलींचे जन्म प्रमाण वाढण्यासाठी आरोग्य विभाग, अंगणवाडीकव शालेय स्तरावर सर्वंकष प्रयत्न होण्याची गरज. आहे असे आ. बोरणारे म्हणाले.
उपजिल्हाधिकारी डॉ,अरुण जऱ्हाड यांनी गर्भलिंग निदान करू नये. मुलींच्या जन्माचे स्वागत करावे असे विशद केले.,श्री. ढोकणे यांनीही मुली जन्म दर वाढण्यासाठी महिला प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सूचित केले. धोंडीरामसिंह राजपूत यांनीही मुलगा मुलगी समान समजावी असे सांगून त्यांच्या जन्माचे स्वागत करावे असे आवाहन केले
विद्या महाडीकर यांनी प्रास्ताविक केले.श्रीमती बोढरे, श्रीमती गायकवाड, श्रीमती रुख्मिनी गवई यांनी सहभाग नोंदविला. किशोर वाघुले यांनी सूत्र संचलन केले."शपथ तुमची आमची-स्त्री पुरुष समानतेची" ही शपथ सर्वांना राजपूत यांनी दिली. वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन.मोरे यांनी सर्वांचे आभार मानले. .
.
0 Comments