HSRP नंबर प्लेट नसेल तर आरटीओतील कामांवर निर्बंध
मुंबई, ता.26 - वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्याची अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली होती.मात्र, वाहनधारकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहता याला पुन्हा 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ अंतिम असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
किचकट प्रक्रिया, पुरेशा माहितीचा अभाव आणि विक्रेत्यांकडून ज्यादा पैशांची मागणी यामुळे ही योजना कासवगतीने सुरू आहे.परिणामी, राज्य परिवहन विभागाला आतापर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ द्यावी लागली आहे. तरी देखील अपेक्षित वाहनांची संख्या गाठता आलेली नाही. वाहनधारकांनी नवीन नंबर प्लेट बसवून घ्यावे याकरिता परिवहन विभागाने विविध स्तरावर प्रयत्न केले. यात एक हजार रुपये दंडाची अट व नवीन नंबर प्लेट नसेल तर संबंधित वाहनांची आरटीओतील कामांवर निर्बंध आणण्याचा देखील निर्णय झाला, तरी देखील वाहनधारकांचा प्रतिसाद लाभला नाही.परिणामी विभागाला पुन्हा सुमारे साडेतीन महिन्यांची म्हणजेच 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ द्यावी लागत आहे. या संदर्भात परिवहन विभागाने 14 ऑगस्ट 2025 रोजी अधिकृत परिपत्रक काढले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) 31 मार्च 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसविण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि, अनेक जुन्या वाहनांवर (HSRP)बसविणे बाकी आहे, शहरी भागामध्ये काही वाहन मालकांना पुढील महिन्यात HSRP बसविण्याची अपॉइंटमेंट मिळाली आहे, राज्यातील ग्रामीण भागात फिटमेंट केंद्र उघडण्यास उशीर झाला आहे,राज्यातील काही फिटमेंट केंद्र बंद पडली असल्याचे निदर्शनास आले आहे, लोकप्रतिनिधी व जनतेकडून HSRP बसविण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी प्राप्त झाली आहे सबब 1एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतर 1 डिसेंबरपासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी HSRP बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तथापि दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत HSRP बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहन मालकांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
HSRP न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे, कर्जबोजा उतरविणे इत्यादी कामांवर आधीच निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यापुढे HSRP न बसविलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनरनोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण वगळून) थांबविण्यात येतील तसेच वायुवेग पथकामार्फत वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना HSRP लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. असे परिपत्रकात म्हटले आहे. या परिपत्रकावर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांची स्वाक्षरी आहे .
0 Comments