जालना,ता.30 - रस्त्यात पदचाऱ्याला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना जालना जिल्हयातील राजूर ते टेंभूर्णी रस्त्यावर गाढेगव्हाण (ता. जाफराबाद) शिवारात शुक्रवारी (ता.29) सकाळी सातच्या सुमारास घडली. मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तातडीने बचाव व मदत करण्यात आले. सात - आठ तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.
डकले परिवारातील अर्धांगवायूने ग्रस्त रुग्णाला उपचारासाठी ते कारने बुलढाणा जिल्हयातील सुलतानपूर गावाकडे निघाले होते. सकाळी सहकाऱ्यांसह मॉर्निंग वॉकला निघालेल्या एका व्यक्तीला धडक देऊन ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. या घटनेत ज्ञानेश्वर डकले, निर्मला डकले, (रा.गेवराई गुंगी, ता.फुलंब्री) पदमाबाई भांगिरे, ज्ञानेश्वर भांगिरे व आजिनाथ भांगिरे (रा. कोपर्डी ता. भोकरदन) या पाच जणांचा मृत्यू झाला.
या घटनेसंदर्भात माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोमानी सांगितले की, कारची पदचाऱ्यास धडक बसली. त्यानंतर चालक गाडी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, परंतु त्याचे नियंत्रण सुटले आणि गाडी कठडे तोडून विहिरीत पडली. विहिरीत पाणी असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत होत्या. सात आठ - तासांच्या प्रयत्नानंतर विहिरीतून पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले.
0 Comments