शहरालगतचे नारंगी धरण 81.57 टक्के भरले.. कोणत्याही क्षणी पाणी विसर्ग
जफर ए. खान
------------------------
वैजापूर, ता.23 - गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात सर्वदूर पाऊस सुरू असून पावसामुळे तालुक्यातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सोमवारी (ता.22) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अस्मानी संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
सोमवारी रात्री वैजापूर शहरासह तालुक्यातील लोणी खुर्द, जानेफळ, खंडाळा या चार मंडळात 65 मि.मी.पेक्षा अधिकचा पाऊस झाला. गंगथडी भागातील वीरगाव व कापूस वाडगाव, म्हस्की परिसरातही अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील मन्याड साठवण तलाव, ढेकू मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प, जरुळ लघु तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहे. शहरालगतच्या नारंगी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला असून डोंगरगाव धरण, जरुळ तलाव भरले आहे. डोंगरगाव नदीतून पाण्याची आवक सुरु असल्याने नारंगी धरणात आतापर्यंत 81.57 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु असून धरणातून कोणत्याही क्षणी पाणी विसर्ग करण्यात येणार आहे. शिवना टाकळी मध्यम प्रकल्पही 100 टक्के भरले असून या धरणातून दुपारी बारा वाजता 3134 क्युसेकने शिवना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. ढेकू धरण 100 टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे.
तालुक्यातील वीरगाव, कापूसवाडगांव, मुर्शदपूर, शिरसगाव, म्हस्की, लोणी खुर्द यासह विविध भागात रविवारी व सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले असून मका, कापूस, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर बाभूळगाव बुद्रुक येथे नदीच्यापुरात एक मोटारसायकलस्वार वाहून गेला होता.त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
दरम्यान आ. रमेश पाटील बोरणारे, भाजपचे डॉ.दिनेश परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेर खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज ठोंबरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नारंगी धरणातून कोणत्याही क्षणी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सोमवार रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यंत तालुक्यातील १२ महसूल मंडळात झालेल्या पावसाची आकडेवारी खालीलप्रमाणे
वैजापूर - 111 मिलिमीटर
लोणी (खु.) - 113.05 मिलीमीटर
जानेफळ - 88.08 मिलिमीटर
खंडाळा- 71.05 मिलीमीटर
बोरसर - 59.05 मिलीमीटर
शिऊर - 59.05 मिलीमीटर
घायगाव - 54 मिलिमीटर
नागमठाण - 35.03 मिलीमीटर
बाबतारा - 32.05 मिलीमीटर
महालगाव - ३५.३ मिलीमीटर
गारज - 25.3 मिलिमीटर
लासुरगाव - 17.08 मिलीमीटर
0 Comments