news today, डोंगरथडी पट्टयात अनेक ठिकाणी अतिवृष्टी ; नद्यांना महापूर, पिके वाहून गेली

हसन सय्यद 
-------------------------

लोणी खुर्द, ता.23-  वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी पट्ट्यात लोणी खुर्द, वाकला, तलवाडा आणि चिकटगाव, भादली, पाराळा  यासह अनेक गावात  सोमवारी (ता.22) रात्री एक ते चार वाजेच्या सुमारास अचानक ढगफुटी झाली. झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला. पुरामुळे नदीपात्र बदलले, शेतजमिनी वाहून गेल्या आणि अनेक ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरूप आले. ढेकू व शिवना नदीने रौद्र रूप धारण केल्याने अनेक पुलाचे नुकसान झाले.

पावसामुळे रस्ते वाहून गेले आणि खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिके पिवळी पडली असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तलवाडा, लोणी खुर्द, वाकला, बाभूळतेल, नायगव्हाण, अंचलगांव, टुनकी, खरज, तित्तरखेडा, भादली, चिकटगाव, पाराळा परिसरातील शेतजमिनींची माती वाहून गेली आहे.त्याचप्रमाणे, लोणी खुर्द  ग्रामपंचायतअंतर्गत  गावठाणात इंदीरा नगर भागात पुराच्या पाण्याने वेढलेल्या  कुटुंबांना मंगळवारी सकाळी सुखरुप बाहेर येता आले. प्रत्येक कुटुंब रात्रभर जीव मुठीत धरून दिवस उजाडण्याची वाट बघत होता. 

लोणी खुर्द परिसरात अतिवृष्टी होऊन नद्या नाल्याना पूर आला आहे... ( छायाचित्रे - हसन सय्यद)

Post a Comment

0 Comments