वैजापूर, ता.27 - मागील तीन चार दिवसांपासून तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील धरणं भरली असून नद्या नाले ओसंडून वाहत आहे. शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
सायंकाळपासून तालुक्यात वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरालगतच्या नारंगी धरणासह तालुक्यातील ढेकू मध्यम प्रकल्प, कोल्ही मध्यम प्रकल्प, मन्याड साठवण तलाव, जरुळ लघु तलाव, खिर्डी लघु तलाव हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून त्याद्वारे 10 हजार 956 क्युसेकने शिवना नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणात 90.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून शनिवारी (ता.27) सायंकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडून त्याव्दारे 72 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर 72 क्युसेसने होत असलेला विसर्ग वाढवून 216 क्युसेस करण्यात आला. रात्री एकच्या सुमारास विसर्ग वाढवून 800 क्युसेक करण्यात आला. प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज रात्री नारंगी धरणाचे दोन दरवाजे उघडून त्याद्वारे 432 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. रात्री एकच्या सुमारास विसर्ग वाढवून तो 800 क्युसेक करण्यात आला.
पावसाळा सुरू झाला तेंव्हापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने नारंगी धरणात अत्यल्प प्रमाणात पाण्याची आवक सुरु होती. ऑगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे पालखेड धरणातून सोडण्यात आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे धरणात 30 ते 40 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. सप्टेंबर महिन्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली व धरणात 50 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. गेल्या तीन चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन धरणात 90 .53 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक सुरुच असल्याने आज रात्री धरणाचे दोन दरवाजे उघडून त्याद्वारे 432 क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. रात्री एकच्या सुमारास विसर्ग वाढवून तो 800 क्युसेक करण्यात आला. नारंगी धरण भरल्यामुळे वैजापूर शहर व परिसरातील नांदगांव, चांडगाव, घायगाव, भगगाव, रोटेगाव यासह 14 चौदा गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
शनिवारी सायंकाळपासून वैजापूर शहरासह तालुक्यातील महालगाव, डोणगाव, बाबतरा, हिंगोणी, कांगोणी, नागमठाण, आघुर, भायगाव, बिलोणी, पानवी खंडाळा, शिऊर, बाजाठाण, वीरगाव, मुर्शदपूर, नारायणपूर, लाडगाव, नांदूरढोक, पोखरी, नायगव्हाण, बाभूळतेल, लोणी खुर्द, खंडाळा परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने ढेकू धरण 100 टक्के भरले असून धरणातून मोठ्याप्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे.
0 Comments