news today, देवगाव येथे बसस्थानकात बस येत नसल्याने पासधारक विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन ; तीन तास वाहतूक ठप्प


अन् विद्यार्थ्यांनी मांडल्या पालकमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा 

रियाज शेख 
-------------------------
देवगाव रंगारी, ता.28 -  देवगाव रंगारी परिसरातील विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करताना होत असलेल्या प्रचंड गैरसोयीच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.26) दुपारी विद्यार्थ्यां पालकांनी अचानक बसस्थानक व फाट्यावर बस रोको आंदोलन केले. तब्बल तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर–वैजापूर मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन प्रवाशांची मोठी दमछाक झाली.

देवगाव रंगारी येथे दोन महाविद्यालये व सहा मराठी–इंग्रजी शाळा आहेत. वरझडी, जांभळा, कसाबखेडा फाटा, दिवशी पिंपळगाव, कानडगाव, किन्हाळ, झोलेगाव, गारज आदी गावांमधील सुमारे 650  पासधारक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी एसटी बसने देवगाव रंगारी येथ ये-जा करतात. मात्र, छत्रपती संभाजीनगर–वैजापूर मार्गावरील बहुतांश बसेस देवगाव रंगारी बस स्थानकात न येता थेट फाट्यावरून जात असल्याने विद्यार्थ्यांना व स्थानिक प्रवाशांना तास न तास थांबावे लागत होते. दुपारपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांना स्थानकात थांबावे लागत होते, तसेच बसमध्ये जागा उपलब्ध न झाल्याने अनेकांना प्रवास करणे अशक्य होत होते.
या रोजच्या समस्येने वैतागलेल्या विद्यार्थ्यां व पालकांनी दुपारी अडीचच्या सुमारास बस स्थानकात आंदोलन सुरू केले. त्यानंतर ते फाट्यावर गेले व बाहेरून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस अडवून ठेवल्या. परिणामी तीन तास वाहतूक ठप्प झाली.

दरम्यान, वैजापूर आगाराचे व्यवस्थापक व संभाजीनगर येथील तिकीट तपासणी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थी व पालक ठाम भूमिकेत असल्याने आंदोलन सुरूच राहिले.


     अन् विद्यार्थ्यांनी मांडल्या पालकमंत्र्यांसमोर समस्या ...

या वेळी झोलेगाव ता वैजापूर येथे कार्यक्रम आटोपून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना विद्यार्थ्यांनी रस्त्यात गाठले. पालक व विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर रोजच्या अडचणी मांडल्या. त्यानंतर पालकमंत्र्यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व बसेस देवगाव रंगारी बसस्थानकात नियमितपणे थांबविण्यात याव्यात अशा सूचना दिल्या. तसेच आदेश न पाळणाऱ्या चालक-वाहकांवर कारवाई केली जाईल असेही स्पष्ट केले. 
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

 या बस रोको आंदोलनामुळे अनेक लांब पल्ल्याच्या बसगाड्या फाट्यावर तीन तास अडकून राहिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.


650 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात... 

देवगाव रंगारी येथे दोन महाविद्यालये आणि सहा मराठी–इंग्रजी शाळा कार्यरत आहेत. या शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी वरझडी, जांभळा, कसाबखेडा फाटा, दिवशी पिंपळगाव, कानडगाव, किन्हाळ, झोलेगाव, गारज आदी गावांतील सुमारे 650 विद्यार्थी दररोज एसटी बसने अपडाऊन करतात.मात्र छत्रपती संभाजीनगर–वैजापूर मार्गावरील बहुतांश बसेस देवगाव रंगारी बसस्थानकात न थांबता थेट फाट्यावरून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळ-संध्याकाळ तासन्तास थांबावे लागते. बसमध्ये जागा उपलब्ध नसल्याने अनेकांना चढता येत नाही, तर काहींना उशिराने घरी पोहोचावे लागते. परिणामी अभ्यासावर मोठा परिणाम होत आहे.

आंदोलनातून विद्यार्थ्यांनी दिला प्रशासनाला धडा ...

तब्बल तीन तास रस्ते रोखून ठेवलेल्या या आंदोलनामुळे केवळ प्रवाशांचीच नव्हे, तर प्रशासनाचीही मोठी दमछाक झाली. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीकडे आता प्रशासन किती गांभीर्याने पाहते आणि आदेश प्रत्यक्षात कितपत पाळले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments