शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज...
वैजापूर, ता .27 - एकीकडे अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेला शेतकरी आणि दुसरीकडे त्याच्यावर आणखी एक आघात ओढावला आहे. तालुक्यातील चेंडूफळ गावातील तब्बल 15 एकर ऊसाच्या फडाला गुरवारी (ता.25) दुपारच्या सुमारास भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात पीक राख झाले.
या आगीत उदय पवार यांच्यासह अन्य दोन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, वर्षभर घाम गाळून उभा केलेला ऊस काही मिनिटांत जळून खाक झाला. शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. मात्र आग एवढ्या झपाट्याने पसरली की नियंत्रण मिळवणे अशक्य ठरले. बळीराजाच्या डोळ्यांसमोर त्याचे कष्टाचे स्वप्न राखेत होरपळून गेले. या दुर्घटनेनंतर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून मदतीची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
0 Comments