news today, आ.बोरणारे यांच्या कार्यालयासमोर धनगर समाजाचे ढोल बजाव जागरण गोंधळ आंदोलन

धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन...
वैजापूर, ता.27 - धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे दिपक बोराडे यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला वैजापूर - गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश बोरणारे यांनी पाठिंबा द्यावा या मागणीसाठी सकल धनगर समाज वैजापूरच्यावतीने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातून पारंपारिक वाद्य वाजवत आमदार रमेश बोरणारे यांच्या मुरारी पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढून ढोल बजाव जागरण गोंधळ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. 

यावेळी आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरणारे हे संपर्क कार्यालयात उपस्थित होते. धनगर समाज बांधवांनी त्यांना लेखी निवेदन देत धनगट व धनगर हे एकच असून धनगर समाज हा मागासलेला आहे हे सिद्ध करायची गरज नाही. यामुळे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे व त्यांचा वनवास संपवावा व यासाठी आमदार रमेश बोरणारे यांनी धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी मागणी निवेदनाव्दारे केली. 

सकल धनगर समाज वैजापूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख, अविनाश भास्कर, ज्ञानेश्वर मेटे, चव्हाण यांच्यासह वैजापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments