मुंबई, ता.27 - अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकरी अडचणीत आलेला असताना त्यांना तातडीने मदत करण्याऐवजी सरकार कागदी घोडे नाचवत आहे. शेती पिकांच्या पंचनाम्याच्या अर्जासोबत जीपीएस एनेबल्ड फोटोची छायांकित प्रत जोडण्याचे निर्देश सरकारने दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना फोटो सक्ती करणार नाही असे मदत व पुनर्वसन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करताना यापूर्वी शेतकऱ्यांना तलाठी एक अर्ज देत हा अर्ज शेतकरी स्वतः भरुन द्यायचे. या अर्जात नाव, गाव, क्षेत्र, पिकाचे नाव, बाधित क्षेत्र, 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान क्षेत्र ,बँकेचा तपशील दिला जातो. परंतु आता मात्र या तपशिलासह अर्जासोबत जीपीएस एनेबल्ड फोटोची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन मोबाईल ॲपव्दारे जीपीएस ऑन करून नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढावे लागणार आहेत.
या संदर्भात धाराशिव चे जिल्हाधिकारी कीर्तीकरण पुजार म्हणाले, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी अर्जासोबत जीपीएस लोकेशन फोटोची प्रत बंधनकारक आहे. हा निर्णय जुनाच असून त्यासंदर्भात राज्य सरकारने निर्देश दिले आहेत.
मागील चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. शेतातील पिकांमध्ये कंबरे इतके पाणी साचले आहे. त्यामुळे शेतात जाणेही शक्य नाही. परंतु राज्य सरकारने मात्र नुकसानग्रस्त पिकांचे छायाचित्र अर्जासोबत जोडण्याचा आग्रह धरला आहे. अचानक हा नियम लागू करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र संतापाची भावना आहे. शेतकऱ्यांनी आर्थिक मदत मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालून छायाचित्रे काढावीत अशी सरकारची इच्छा आहे का असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. अभूतपूर्व संकटात युद्धपातळीवर मदत करायची सोडून छायाचित्र सक्तीची अट घातल्याने शेतकऱ्यांचे हाल अधिकच वाढणार आहेत.
शेतकऱ्यांना फोटो सक्ती करणार नाही - पीक पंचनाम्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाचे स्पष्टीकरण ...
---------------------------------------------
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जीपीएस एनेबल्ड केलेला फोटो अपलोड करण्याची शेतकऱ्यांना सक्ती करणार नाही. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. मराठवाड्यातील गेल्या चार दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या अर्जात नुकसान क्षेत्राचा जीपीएस एनेबल्ड टॅगिंग असलेला फोटो जोडण्यात यावा, असे नमूद केले आहे. परंतु असे फोटो शेतकऱ्यांनी काढणे अपेक्षित नाहीत असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे स्वीय सहायक राजेंद्र केजरे यांनी स्पष्ट केले.
पंचनामा करणाऱ्या यंत्रणांनी जागेवर जाऊन पाहणी करून तपशील नोंद करणे अपेक्षित आहे तसेच स्थळ पाहणीवेळी कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष पंचनामे करून फोटो काढणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments