news today, भायगाव येथे चोरट्यांनी वृध्द दाम्पत्याला मारहाण करून लुटले

वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल ; संशयिताची चौकशी 

वैजापूर, ता.26 - चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात चोरट्यांनी वृद्ध दांपत्यास जबर मारहाण करीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना तालुक्यातील भायगाव येथे गुरुवारी (ता.25) रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली..या घटनेत वृध्द दांपत्य गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी  वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश बाळाभाऊ ठोंबरे (वय 65 वर्षे) व लिलाबाई प्रकाश ठोंबरे (वय 60 वर्षे) रा. भायगाव अशी घटनेतील जखमी नावे आहेत.
या प्रकरणात त्यांचा मुलगा सतीश प्रकाश ठोंबरे (वय 36 वर्षे रा. भायगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते व त्यांचा भाऊ हे शेत वस्तीवर राहतात तर त्यांचे आई-वडील हे भायगाव येथे राहतात. घराशेजारीच त्यांच्या मोठ्या भावाचे मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्याचे दुकान आहे. गुरुवारी रात्री त्यांना रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फोनवरून कळाले की, त्यांच्या आई-वडिलांना चोरट्यांनी जबर मारहाण केली आहे. त्यांनी तात्काळ गावातील घरी धाव घेतली तेव्हा त्यांना त्यांचे वडील व आई हे गंभीर जखमी अवस्थेत दिसून आले. वृध्द आई वडिलांना त्यांनी तात्काळ वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले  दरम्यान त्यांच्या आईने घडलेल्या घटनेबाबत बोलताना सांगितले की, घरात झोपलेले असताना रात्री अकरा सुमारास कोणीतरी दरवाजा ठोठावला. त्यांना वाटले मोठा मुलगा हा दुकानात साहित्य ठेवण्यासाठी आलेला असावा म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर एका इसमाने त्यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तू मारून त्यांना जखमी केले. यानंतर वडिलांना देखील मारहाण केली व त्यांच्या गळ्यातील 30 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन तो पळून गेला. 

सतीश ठोंबरे यांनी जखमी आई-वडिलांना प्रथम वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी शहरातील खाजगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले आहे. या प्रकरणात वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान ही घटना घडल्यानंतर रात्रभर ग्रामस्थांनी परिसर पिंजून काढला यात सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान एका संशयिताला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान पोलिसांकडून संशयित व्यक्तीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Post a Comment

0 Comments