सकल मराठा समाजातर्फे फटाके वाजवून सरकारच्या निर्णयाचे स्वागत ...
वैजापूर, ता.02/ प्रतिनिधी -मराठा आरक्षणासंदर्भात मागील चार दिवसांपासून मुंबई येथील आझाद मैदानावर सुरु असलेले मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मंगळवारी शासन निर्णय जारी केल्यानंतर जरांगे यांनी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सरबत पिऊन उपोषण सोडले.
या निर्णयाद्वारे मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीची प्रमाणपत्रे मिळण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आल्याने सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या निर्णयाची माहिती मिळताच वैजापूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येऊन जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. मराठा सेवक प्रशांत पाटील सदाफळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सभापती अविनाश पाटील गलांडे, बाजार समितीचे संचालक कल्याण पाटील जगताप, अमोल बोरणारे, सोमू सूर्यवंशी, रावसाहेब मोटे यांच्यासह अनेक मराठा कार्यकर्त्यांनी या आनंदोत्सवात सहभाग नोंदवला.
शहरातील येवला नाका परिसरातील संभाजी चौकातही मराठा कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत तसेच छत्रपती शिवाजी महाराज कीं जय, मनोज जरांगे तुम आगे बढो अशा घोषणा देत जल्लोष केला. संभाजी चौकात बँड बाजाच्या निनादात हा उत्सव साजरा करण्यात आला. तालुक्याच्या ग्रामीण भागातही विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष केल्याचे वृत्त आहे.
0 Comments