news today, वैजापूर नगरपालिका प्रभाग रचनेवर चार हरकती दाखल

वैजापूर, ता.02 /प्रतिनिधी -  नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप व सूचना स्वीकारण्यासाठी रविवार (ता 31) शेवटचा दिवस होता. एकूण चार आक्षेप दाखल झाल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार वैजापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा   मुख्याधिकारी तथा प्रशासक बी यू. बिघोत यांनी प्रसिध्द केला होता. या प्रारूप आराखड्यावर 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना मांडायला संधी देण्यात आली होती.
त्यानुसार माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रियाज अकिल शेख, साबीर शेख व सलीम शेख यांनी प्रभाग रचनेबाबत तक्रारी केल्या. पुर्वीच्या प्रभागातील वस्त्यांमध्ये फेरबदल झाल्याबाबत या तक्रारी आहेत.

वैजापूर नगरपालिका ही 'ब' वर्ग नगरपालिका असून शहराची लोकसंख्या 41 हजार 296 इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 6279 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 1061 इतकी आहे. लोकसंख्येनुसार प्रभाग संख्येत एकने वाढ झाली आहे असून, आता प्रभाग संख्या 12 झाली आहे.
नगरसेवकांच्या संख्येत दोनने वाढ होऊन आता नगरसेवकांची संख्या 25 झाली आहे. त्यामुळे शहरातील अकरा प्रभाग दोन सदस्यीय व एक प्रभाग तीन सदस्यीय असणार आहे.
 प्रभाग क्रमांक 1 ते 11 मध्ये दोन नगरसेवक तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये तीन नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.

31 ऑगस्टपर्यंत  आराखड्यावर नागरिकांना हरकती  मागविण्यात आल्या होत्या . प्राप्त हरकती व सूचनांवर 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होईल. त्यानंतर हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन अंतिम केलेली प्रभाग रचना जिल्हाधिकारी 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान नगरविकास विभागाकडे सादर करतील. त्यानंतर नगरविकास विभागातर्फे 12 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल. राज्य निवडणूक आयोग 26 सप्टेंबर ते सप्टेंबरपर्यंत अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनाद्वारे प्रसिध्द करणार आहे .

Post a Comment

0 Comments