नाशिक, ता.17 - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी (ता.15) नाशिक येथे शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला.प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नाशिक येथील गोल्फ क्लबपासून निघालेल्या या मोर्चात पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, खा.सुप्रिया सुळे, आ.जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, फौजिया खान, राजेश टोपे, डॉ.राजेंद्र शिंगणे, खा निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, आ.रोहित शिंदे, भास्कर भगरे, अभिजित पाटील, दीपिका चव्हाण आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी कर्जमाफी, पीकविमा, पिकाला हमीभाव, कापूस आयात, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान भरपाई अशा विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी बांधवांनी सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करत सरकारच्या दुटप्पी धोरणाविरोधात रोष प्रकट केला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या सोबत असून शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी आणि जगण्यासाठीचा संघर्ष आगामी काळातही अधिक जोमाने सुरू राहील, हा निर्धार या मोर्चातून करण्यात आला.
0 Comments