वीरगाव व कापूसवाडगांव या दोन गावांचा संपर्क तुटला..
वैजापूर, ता. 20 - तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. विशेषतः शुक्रवारी (ता.19) झालेल्या पावसामुळे तालुक्यातील वीरगाव आणि कापूसवाडगाव या दोन गावांचा संपर्क तुटला आहे. या दोन्ही गावांभोवती अक्षरशः पाण्याचा वेढा पडला असून ग्रामस्थ मोठ्या संकटात सापडले आहेत.
शेती पिके मोठ्या प्रमाणावर पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन, मका, कापूस यांसारखी खरीप पिके जलमय झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतकरी हातावर हात ठेवून बसले असून पावसाचे पाणी ओसरेपर्यंत काहीही उपाययोजना करता येत नाही.
दरम्यान, गावातील अनेक नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत. काही ठिकाणी नागरिक पाण्याच्या प्रवाहात अडकले असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडे पोहोचली आहे. त्यानंतर स्थानिक प्रशासन, पोलीस पथक तसेच ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. तर काहींना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय परिसरातील लहान नाल्यांना मोठा पूर आल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक ग्रामीण रस्त्यांवर पाणी साचले असून दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे.
भाजपचे डॉ.दिनेश परदेशी यांची गंगथडी भागातील गावांना भेट व नुकसानीची पाहणी ...
भाजप नेते, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी यांनी आज गंगथडी भागातील वीरगाव,मुर्शदपुर पंचक्रोशीत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच याच परिसरातील मुर्शदपूर, नादी, म्हस्की कापूसवडगाव येथेही झालेल्य नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या तक्रारीही जाणून घेतल्या.यावेळी कृषी सहायक अधिकारी मीना पंडित, श्रीमती सोनवणे, तलाठी संदीप पवार, कृषी पर्यवेक्षक माधव गांगुर्डे उपस्थित होते. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शासन दरबारी पाठविणे बाबत त्यांनी सूचना दिल्या. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर बारसे, शेतकरी नेते धनंजय धोर्डे, सरपंच निलेश डहाके, दादासाहेब बारसे, बाळासाहेब परदेशी, लक्ष्मण आत्रे, रमेश विघे पोलीस पाटील, भाऊसाहेब नागुडे, रोहन बारसे, साहेबराव नागुडे, गोकुळ बारसे, गोरख साळूंके, बाबासाहेब साळुंके, व्यंकट थोरात, रमेश रायते, बबलू कदम, नारायण खिल्लारे, सद्दाम भाई, संभाजी थोरात उपसरपंच, वाल्मिक चव्हाण, योगेश डहाके, जब्बार भाई शेख, रवि त्रिभुवन आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील ठोंबरे यांनी तालुक्यातील म्हस्की, वीरगाव, कापुसवाडगाव, नादी, सटाणा येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पावसामुळे शेतातील पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडला असून या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी महसुल प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
परिस्थितीवर आम्ही नियंत्रण ठेवून आहोत, पुढील २४ तासांत अजून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे. घराबाहेर न पडण्याचे आव्हान करतो.विशेषतः नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी थांबावे, मदत लागल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
--- सुनील सावंत तहसीलदार वैजापूर.
0 Comments