उपसरपंच पांडुरंग बोरकर यांच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू
प्रभाकर जाधव
---------------------------
गारज, ता.04 - वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथील ढेकु नदीच्या पात्रात तीन युवक पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे वाहून जात असताना त्यातील दोन जण बचावले आहे. तर तिसरा युवक पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.04) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. अजय पांडुरंग बोरकर असे मयत तरुणाचे नाव आहे. घटनेत मृत पावलेला तरुण आईला कपडे धुण्यासाठी मदत करण्यासाठी नदीवर गेला होता अशी चर्चाही गावात आहे.
दोन तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना अजयचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश ...
राहेगाव येथील अक्षय बाळु शेलार (वय 25 वर्ष), ओम सतिश बोरकर (वय 20 वर्ष), अजय पांडुरंग बोरकर (वय 22 वर्ष) हे तीन युवक धोंदलगाव राहेगाव पुलाजवळील ढेकु नदीच्या पाण्यात शनिवारी सकाळी पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघे जण वाहु लागल्याचे लक्षात आल्यावर ग्रामस्थांनी त्यातील दोन जणांना वाचविले. परंतु उपसरपंच पांडुरंग बोरकर यांचा एकुलता एक मुलगा अजय पांडुरंग बोरकर हा पाण्यात वाहून गेला. गाळात अडकल्याचा संशय आल्याने तलाठी अमरसिंह तेजराम यांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला देऊन पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवान छगन सलामबाद, रितेश कसुरे, विशाल घरडे, कमलेश सलामबाद, संकेत निकाळजे, सचिन शिंदे, विनोद ब्राह्मणे, रवी दुधे व सचिन मुळे यांनी शोधकार्य सुरू केले असता सकाळी साडे अकराला अजयचा मृतदेह सापडला. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका दौंडमनी व डॉ. चंदे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.
.
घटनेची माहिती मिळताच आमदार रमेश बोरणारे व वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरू करण्यात आले.
वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
यावेळी एकनाथ म्हस्के, रमेश शेजुळ, उमेश शेलार, बळीराम म्हस्के रामनाथ शेलार, मनोज म्हस्के यांनी घटनास्थळी मदतकार्यासाठी पुढाकार घेतला. अजयच्या पश्चात आई, वडील, एक लहान बहीण असा परिवार आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments