वैजापूर, ता 03 -हायवा ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वडील व मुलगी हे दोघे ठार झाले तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना शुक्रवारी (ता.03) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वैजापूर - लाडगाव रस्त्यावर रोठीजवळ घडली. अय्युब मुनीर शाह (वय 45 वर्ष) व अश्मिरा अय्युब शाह (वय 12 वर्ष) अशी मृतांची नावे असून अय्युब यांची पत्नी अंजुब अय्युब शाह (वय 35 वर्ष) या घटनेत गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीव वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे उपचार सुरु आहेत. हे सर्व नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील राहणारे आहेत. दरम्यान घटनेनंतर हायवा चालक पसार झाल्याची महिती समोर आली आहे.
मयत अय्युब मुनीर शाह हे आठवडी बाजारात मसाला विक्रीचा व्यवसाय करत होते. मुलीला भेटण्यासाठी ते पत्नी अंजुम व बारा वर्षाची मुलगी अश्मिरा यांना घेऊन श्रीरामपूरला गेले होते. तेथून परतत असताना त्यांच्या दुचाकीला (एम.एच.41 ए.आर.8955) लाडगावकडे जाणाऱ्या हायवा ट्रकने (एम.एच.17 बी.झेड. 9991) वैजापूरच्या रोठीजवळ जोराची धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार अय्युब शहा ट्रकखाली चिरडल्याने जागीच मयत झाला. सर्वाना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अश्मिरा व अंजुम यांना प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, अश्मिरा हिचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल किसन गवळी, आर.टी.सुके, त्र्यंबक बुधवत यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना बाबासाहेब वाळुंज, शिवाजी लांडे, अविनाश आहेर, सुयोग हिंगे, अतुल निर्मळ, मयुर लांडे यांनी मदतकार्य केले.
या प्रकरणी वैजापूर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments