मुंबई,ता.07 - राज्यातील 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांचे शिंतोडे अधूनमधून उडत असताना पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या कंपनीने पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात तब्बल 21 कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क माफी मिळवल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा अडचणीत आले आहेत. या निर्णयाला प्रसार माध्यमातून वाचा फुटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी सुरू होण्यापूर्वीच प्रकरणाशी संबंधित पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. विरोधी पक्षांने या प्रकरणी अजित पवार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे, तर आपला या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नसल्याचा खुलासा करत अजित पवार यांनी हात झटकले आहेत.
पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क येथील 1 हजार 800 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली 40 एकर जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांना खरेदी केली.या जमीन खरेदी व्यवहारात शासनाकडे 21कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्यात आले. नियमानुसार मुद्रांक शुल्क न आकारल्याप्रकरणी सहदुय्यम निबंधकाचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
प्रकरण काय ?
पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीने मे 2025 मध्ये कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन खरेदी केली. यातील महार वतनदार असलेल्या हक्कदारानी या जगेसंदर्भातील कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) शीतल तेजवानी यांना दिले होते.त्याआधारे अमेडिया कंपनीने ही जमीन तेजवानी यांच्याकडून 300 कोटी रुपयांना. खरेदी केली. खरेदीची रक्कम साधारण रेडी रेकनरनुसार असली, तरी प्रत्यक्षात कोरेगाव पार्कमधील सध्याच्या भावानुसार जमिनीची किंमत यापेक्षा जास्त आहे. प्रत्यक्षात ही जमीन सरकारने 1988 मध्ये बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 50 वर्षाच्या भाडेकराराने दिली आहे. कागदपत्रांवर राज्य शासनाचे नाव आहे. तेजवणी यांनी अधिकार नसताना जागेची विक्री केली आणि पवार यांनी ती घेतली. या जागेवर खासगी आयटी पार्क उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगून 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करून घेण्यात आले आहे.
माझा दुरान्वयेही संबंध नाही - अजित पवार
पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणाशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. काही महिन्यांपूर्वीच माझ्या कानावर हा प्रकार आला होता. त्यावेळी चुकीच्या गोष्टी चालणार नाहीत, असे मी बजावून सांगितले होते. पुढे त्याचे काय झाले मला माहीत नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ती चौकशी जरूर व्हावी आणि सत्य काय आहे ते समोर यावे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
0 Comments