news today, वैजापुरात छाननीत दहा जणांचे उमेदवारी अर्ज बाद ; 331 अर्ज वैध

वैजापूर, ता.22 - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या 341 अर्जाची निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता.22) येथील पंचायत समिती कार्यालयाच्या नाम निर्देशन कक्षात छाननी करण्यात आली. आठ गटांसाठी 151 व सोळा गणासाठी 190 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते अशी माहिती निवडणूक कक्षातून देण्यात आली.
     
या छाननीत संवंदगाव गटातून एक, लासूरगाव गटातून चार व वांजरगाव गटातून एक असे सहा नामनिर्देशन पत्र अवैध ठरवण्यात आले. तर मनूर गणातून व लासूरगाव पंचायत समिती गणातून प्रत्येकी दोन असे चार अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी 145 अर्ज व पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी 186 असे 331 अर्ज प्रशासनाने वैध ठरवले आहेत. 27 जानेवारी हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने त्यानंतरच निवडणूक रिंगणात किती उमेदवार आहेत हे स्पष्ट होणार आहे.

 शिऊर गटात निकम यांचा आक्षेप ...

तालुक्यातील शिऊर जिल्हा परिषद गटात सुनील पैठणपगारे यांनी भाजपतर्फे आपला उमेदवारी अर्ज भरला आहे तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे संजय  निकम यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. छाननीच्या वेळी संजय निकम यांनी भाजपचे सुनील पैठणपगारे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड यांच्या समोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तीवाद केला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निर्णय राखून ठेवला असून, याप्रकरणी, आज शुक्रवारी निकाल देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments