तक्रारदार अंगणवाडी सेविकांना टार्गेट, अकारण नोटीसा बजावून मानसिक त्रास देण्याचा खटाटोप
वैजापूर, ता.18 - वैजापूर एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचार, अनियमितता व गैरव्यवहारांप्रकरणी प्रभारी प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांची तत्काळ बदली करून स्थायी महिला प्रकल्प अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, तसेच प्रकल्पाच्या सर्व बँक खात्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राज्यसचिव कॉ. शालिनी पगारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.05) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या तक्रारीनंतर प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांनी सेविकावर सूड उगवण्यास सुरुवात केली. तक्रारदार असलेल्या सेविकांच्या अंगणवाडी केंद्रांना कधी नव्हे त्या भेटी देत हेतुपुरस्सर सूडभावनेतून नोटिसा बजावल्या जात आहेत. यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या या अधिकाऱ्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
वैजापूर बालविकास प्रकल्प हा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून त्याअंतर्गत 391 अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये तेवढ्याच संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. वैजापूर प्रकल्प हा गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आहे. सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून पैसे उकळल्याचा आरोप असून, त्या संदर्भात कार्यालयात कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर 2024 मध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.
3 ते 6 वयोगटातील बालकांसाठीच्या पूरक पोषण आहाराची बिले तब्बल 14 महिन्यांपासून प्रलंबित होती. बजेट प्राप्त झाल्यानंतरही सेविका व बचत गटांच्या 5 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंतची रक्कम जाणीवपूर्वक कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच काही सेविकांच्या खात्यावर मोठ्या रकमा जमा करणे व त्या चुकून पडल्याचे दाखवत पुन्हा परत रोख स्वरूपात मागणे, वैयक्तिक चेकद्वारे व्यवहार करणे, लाडकी बहीण योजनेचा प्रोत्साहन भत्ता देण्यात समतोल न ठेवणे इत्यादी बाबींकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. एकूणच अजूनही प्रकल्पात कर्मचाऱ्यांची अप्रत्यक्ष लूट सुरू असून वेगवेगळ्या मार्गाने कथित आर्थिक घोटाळे झाले असल्याचा आरोप असल्याने या पार्श्वभूमीवर प्रभारी प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांची तत्काळ बदली करण्यात यावी तसेच वैजापूर बालविकास प्रकल्पाच्या सर्व बँक खात्यांतील व्यवहारांची सखोल चौकशी करावी, त्यासाठी चौकशी समिती नेमावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
'सूड भावनेतून अधिकारी रिव्हेंज मोडवर '
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. एकीकडे गंभीर आरोप असलेल्या प्रभारी अधिकाऱ्याची बदलीची मागणी होत असताना, वरिष्ठ कार्यालयाकडे आरोपाचा समाधानकारक खुलासा न करता संतोष जाधव यांनी तक्रारदार अंगणवाडी सेविकानं टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. यातून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप सेविकांमधून केला जात आहे.
0 Comments