news today, स्वीकृत नगरसेवकपदी मर्जीतील नातेवाईक व कार्यकर्त्यांची वर्णी लावणे अवघड

नगरविकास विभागाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी निकष जाहीर...

वैजापूर, ता.10 - नगरविकास विभागाने स्वीकृत नगरसेवक निवडीचे निकष जाहीर केले आहे. या निकषामुळे मात्र आता नेत्यांना स्वीकृत नगरसेवकपदी मर्जीतील नातेवाईक किंवा जवळच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावणे अवघड झाले आहे. स्वीकृत नगरसेवक पदावर अभ्यासू व अनुभवी व्यक्तींना संधी मिळणार असून पालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या ज्ञानाचा फायदा शहर विकासासाठी होण्यासाठी स्वीकृत नगरसेवक घेण्याची तरतूद नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम आणि मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमांमध्ये करण्यात आले आहे. निर्वाचित पालिका सदस्यांच्या एकूण संख्येच्या 10 टक्के किंवा 5 पैकी जी कमी असेल त्या संख्येएवढे स्वीकृत नगरसेवक निवडण्याची तरतूद आहे.

नगरपालिका अधिनियमातील मूळ तरतुदींना हरताळ फासून राजकीय मंडळी कुटुंबियातील सदस्यांची किंवा जवळच्या कार्यकर्त्यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लावत होते. पक्षश्रेठींच्या मर्जीतील कार्यकर्तेही नगरसेवकपदाच्या माध्यमातून पालिका सभागृहात जात होते. नगरविकास विभागाचे उपसचिव ए.एस. जीवने यांनी काढलेल्या अध्यादेशानुसार स्वीकृत नगरसेवक पदासाठी नगरपालिका, महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. पाच वर्षाचा अनुभव असणारे डॉक्टर, निवृत्त प्राचार्य, वकील, इंजिनिअर, निवृत्त अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी स्वीकृत सदस्य म्हणून निवड करता येणार आहे. 

स्वीकृत नगरसेवक पदासाठी निकष ...
1) मान्यतप्राप्त व नोंदणीकृत वैद्यक व्यवसायिक म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव 
2) शिक्षणतज्ज्ञ म्हणून पाच वर्षाचा अनुभव 
3) निवृत्त प्राचार्य, प्राध्यापक 
4) सनदी लेखापाल म्हणून पाच वर्षाचा अनुभव 
5) पाच वर्षाचा अनुभव असलेला अभियांत्रिकी पदवीधारक
6) अभिवक्ता किंवा राज्यात पाच वर्षे विधी क्षेत्राचा अनुभवी व्यक्ती 
7) मुख्याधिकारी, सहायक आयुक्त,उपयुक्त पदावरून सेवानिवृत्त 
8) नोंदणीकृत समाजाधिष्ठित संस्थेत 5 वर्ष पदाधिकारी कामाचा अनुभव 

Post a Comment

0 Comments