छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची कारवाई ...
वैजापूर, ता.21 - छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीसानी अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात मोठी कारवाई करत वैजापूर तालुक्यात तब्बल 27 लाख 9 हजार 225 रुपयांच्या 180 किलो वजनाच्या अफूच्या पिकाची झाडे जप्त केली. या प्रकरणी करंजगाव येथील 65 वर्षीय शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक वैजापूर पोलीस स्टेशन हद्दीत ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवत असताना गोपनीय माहितीदाराकडून करंजगाव शिवारातील गट नंबर 132 मध्ये बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या आदेशानुसार एलसीबी पथकाने मध्यरात्री संबंधित शेतावर छापा टाकला.
छाप्यात शेतात मोठ्या प्रमाणावर अफूची झाडे आढळून आली. पोलिसांनी 180 किलो वजनाची झाडे मुळासकट जप्त केली. जप्त मालाची किंमत सुमारे 27 लाख रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी आरोपी कचरू बाबुराव धुरट (रा. करंजगाव, ता. वैजापूर) याला ताब्यात घेऊन वैजापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(ब) व 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थ उत्पादकांचे धाबे दणाणले असून, अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
0 Comments