news today, वैजापूर पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकणार ; सभापतीपदी वंदना शिंदे यांची वर्णी लागणार


वैजापूर, ता.17 - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेने 4 व पंचायत समिती निवडणुकीत 7 जागा पटकावित मैदान मारले. आता सत्तासमीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. शिवसेनेच्या सभापती पदाची दावेदार महिला निवडून तर आलीच; परंतु शिवसेनेकडे पक्षा व्यतिरिक्त अन्य पक्षांच्या तीन सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेने केल्यामुळे हे संख्याबळ 10 झाले आहे. त्यामुळे शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापती पदावर त्यांच्याच पक्षाच्या सदस्याची वर्णी लागणार, हे आता स्पष्ट झाले आहे. 

     सवंदगाव पंचायत समितीच्या गणातून निवडून                   आलेल्या वंदना शिंदे 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या 8 जागांपैकी सर्वाधिक 4 व पंचायत समिती निवडणुकीतही सर्वाधिक 7 जागा मिळविल्या. जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या स्वतंत्र 3, पुरस्कृत व पाठिंब्याने अशा दोन जागा खेचल्या. पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेच्या स्वतंत्र 7, याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 1, उबाठा शिवसेना 1 व शिवसेना पुरस्कृत अपक्ष 1 अशा एकूण 10 जागा आमच्या असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या एकूण १६ जागांपैकी सद्यस्थितीत 10 जागा आहे. याचाच अर्थ शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असल्याने सभापतीपदी संवदगाव पंचायत समिती गणातून वंदना शिंदे याचीच वर्णी लागणार, हे आता निश्चित झाले आहे. या विजयाच्या माध्यमातून मुख्य प्रतोद आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी तालुक्यात आपलेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे या सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांची छायाचित्रे पक्षाच्या डिजिटल बॅनरवर झळकली आहेत. आमच्या हक्काचे आणि मतदान करणारे 10 सदस्य असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहेच. सभापती पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातील महिला सदस्यही त्यांच्याकडे आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्याकडे स्वपक्षासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेच. परंतु हा आकडा 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी तोकडा आहे. असे असले तरी त्यांच्या पक्षातील सभापती पदाची महिला उमेदवार निवडून आलेली असून आमचेही संख्याबळ 9 असल्याचा दावा डॉ. परदेशींनी केला आहे. त्यामुळे डॉ. परदेशी ऐनवेळी काय डावपेच आखतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत डॉ. परदेशींनी एकहाती सत्ता मिळवून सत्ता खेचून आ. बोरनारेंना सत्तेपासून रोखले. परंतु या पराभवाची दोन महिन्यांत परतफेड करून आ. बोरनारे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. आता पंचायत समितीच्या सत्तास्थापनेचा 'जुगाड' सुरू झाला आहे. कोण काय डावपेच आखतात? कोण आपली पकड ठेवतात? हे मात्र येणाऱ्या काळात समजेलच! 

आमदार बोरनारेंचा षटकार ...

दरम्यान शिवसेनेच्या ताब्यातून कृषी उत्पन्न बाजार समितीसारखी संस्था गेली असलीतरी आमदार रमेश बोरनारे यांनी पंचायत समिती खेचून दुसरे ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाणारे सत्ताकेंद्र खेचून षटकार लगावला आहे. ऐन निवडणुकीच्या गदारोळातच शिवसेनेचे सभापती रामहरी जाधव यांच्याविरुद्ध भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) 13 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल पारित करून खुर्चीला सुरूंग लावला. 


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी भरभरून जागा निवडून देत पंचायत समितीत शिवसेनेला एकहाती सत्ता सोपवली. आठ सदस्य तर आमचेच आहेत; परंतु अन्य दोघेही आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आम्हाला सत्तेपासून कुणीच रोखू शकणार नाही. बाजार समितीची सत्ता गेल्याचे वैषम्य नाही. परंतु आगामी काळात काय - काय होते? ते तुम्ही बघाच.
- प्रा. रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर 

शिवसेना गोटातील सदस्यांची नावे अशी:..

राजीव साळुंके (शिवसेना)
सुनील कदम (शिवसेना)
राजीव साळुंके (शिवसेना)
भगवान साठे (शिवसेना) 
राहुल शेळके (शिवसेना)
वंदना शिंदे (शिवसेना)
राधिका ठुबे ( शिवसेना पुरस्कृत अपक्ष)
अर्चना शेलार (शिवसेना) 
सोनाली जाधव (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
हुसेन शेख ( उबाठा शिवसेना)

Post a Comment

0 Comments