news today, जरुळ फाट्याजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; दोन तरुण जागीच ठार

खंडाळा येथील तीन मित्रांवर काळाची झडप 

ईद सणासाठी कपडे खरेदी करण्यासाठी दुचाकीवर वैजापुरला येत असताना घडलेली घटना ...



वैजापूर, ता.2 - सण असो वा उत्सव, आनंदाचे वातावरण क्षणात दुःखात कसे बदलू शकते, याचाच प्रत्यय वैजापूर तालुक्यात आला आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर कपड्यांची खरेदी करण्यासाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या तीन मित्रांच्या आयुष्याचा प्रवास एका भीषण अपघाताने थांबवला. राष्ट्रीय महामार्ग ७५२-एच वर जरूळ फाटा परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे खंडाळा गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अयान रमजान शहा (वय 19 वर्षे) आणि अरमान शरीफ शेख (वय 19 वर्षे, दोन्ही राहणार खंडाळा) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तर त्यांचा तिसरा मित्र फैसल लाला खान (वय 20 वर्षे, रा. खंडाळा) हा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही तरुण आपल्या दोन दुचाकींवरून ईदसाठी नवीन कपडे खरेदी करण्याच्या उद्देशाने वैजापूर शहराकडे येत होते. मात्र, काळाने वाटेतच त्यांच्यावर झडप घातली.

हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर एका दुचाकीचे चाक निखळून तब्बल 100 ते 150 फूट लांब फेकले गेले. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी हा थरार पाहिल्यानंतर तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक वाहेद पठाण यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने अयान शहा याला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्राण सोडावे लागले होते. दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

दुसरीकडे, फैसल आणि अरमान यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. मात्र, अरमानची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा सल्ला दिला. अरमानला घेऊन रुग्णवाहिका छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाली, परंतु दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली. एकाच गावातील दोन तरुण मित्रांचा अशा प्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने खंडाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच मृतांच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. तरुणांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे. ज्या घरात ईदच्या सणाची तयारी सुरू होती, तिथे आता सुतकी कळा पसरली आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर चालक वाहन घेऊन फरार झाला असून, वैजापूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. महामार्गावरील वाढती वाहतूक आणि वेगावर नियंत्रण नसल्यामुळे असे भीषण अपघात वारंवार घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

0 Comments