छत्रपती संभाजीनगर, ता.19 – सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ता. 18 व 19 फेब्रुवारी रोजी मराठवाडा महसूल प्रबोधिनी येथे शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात ऐतिहासिक परंपरेचा जागर आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे व उपजिल्हाधिकारी श्रीमती संगीता राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोकाभिमुख प्रशासन पद्धतीचा आजच्या पिढीने आदर्श घ्यावा, असे मत व्यक्त करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत श्री. खंडेराय कला मंडळम यांच्या 35 कलावंतांच्या पथकाने बहारदार सादरीकरण केले. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासावर आधारित नृत्यनाट्य, पारंपरिक लोककला, लावणी, पोवाडा आणि देशभक्तीपर गीतांनी सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. विशेषतः पोवाड्याच्या माध्यमातून शिवचरित्रातील पराक्रम जिवंत करण्यात आला, तर लोकनृत्यांच्या सादरीकरणातून महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता प्रभावीपणे दर्शविण्यात आली.
या कार्यक्रमात प्रा. समाधान इंगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी परिचय करून दिला. त्यांनी शिवकालीन प्रशासन व्यवस्था, स्वराज्य स्थापनेतील संघर्ष आणि सामाजिक बांधिलकी यांवर प्रकाश टाकत उपस्थितांना इतिहासाचा नव्याने परिचय करून दिला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक सोहळ्यामुळे इतिहास, संस्कृती आणि राष्ट्राभिमान यांचा संगम अनुभवण्याची संधी उपस्थितांना मिळाली.
शिवजन्मोत्सवाचे हे आयोजन केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, नव्या पिढीमध्ये स्वराज्याच्या मूल्यांची जपणूक आणि राष्ट्रीय अभिमान जागविण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.
0 Comments