news today, वैजापूर तालुक्यात मतदार यादी पुनर्रनिरीक्षण कामात हलगर्जीपणा ; 20 बीएलओंना कारणे दाखवा नोटीस

उपविभागीय अधिकारी डॉ.अरुण जऱ्हाड यांची कारवाई ...

वैजापूर, ता .10 - निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन तसेच निवडणूक संबंधित कामांमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने कामचुकारपणा करणाऱ्या 20 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 
निर्धारित मुदतीत मतदार यादी पुनर्रनिरीक्षण  कार्यक्रमांतर्गत महत्त्वाची कामे पूर्ण न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असून उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी या नोटीस बजावल्या आहेत. या कारवाईमुळे प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 व 1951 अंतर्गत बीएलओंना सोपविण्यात आलेली अनेक महत्त्वाची कामे 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. यासाठी एकूण 353 बीएलओंची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये काही ठिकाणी शिक्षक तर काही ठिकाणी ग्रामसेवकांना जबाबदारी देण्यात आली होती. सन 2002 च्या मतदार याद्यांतील मतदारांची मॅचिंग, मतदार वंशावळीचे मॅपिंग तसेच अस्पष्ट छायाचित्र दुरुस्ती यांसारखी तांत्रिक कामे यामध्ये समाविष्ट होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून ही कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्यात आली नाहीत.
प्रशासनाने स्पष्ट केले की, बीएलओंना यापूर्वी प्रशिक्षण देऊन सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच व्हॉट्सअ‍ॅपसह विविध माध्यमांतून सातत्याने सूचना देण्यात येत होत्या. तरीही काही अधिकाऱ्यांनी केवळ 45 तर काहींनी 50 टक्क्यांपर्यंतच काम पूर्ण केले असून ही गंभीर निष्काळजीपणा आहे. नोटीसमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, हे कृत्य निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन असून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 32 व 134 अंतर्गत कर्तव्यातील कसूर मानली जाऊ शकते. संबंधित सर्व 20 बीएलओंना नोटीस मिळाल्यानंतर २४ तासांच्या आत लेखी व सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेल्या बीएलओंची नांवे ...

मच्छिंद्र रावते, मच्छिंद्र पठारे (धोंदलगाव), रवी फलटणकर (जरुळ), विश्वनाथ उगले (चांडगाव), सनी गायकवाड (लासूरगाव), अनिल गांगुर्डे (काटेपिंपळगाव), सचिन दराडे (वडाळी), वाल्मिक कुरणे (वरखेड), सुर्यकांत पालवे (वाहेगाव). याशिवाय वैजापूर शहरातील सर्वाधिक बीएलओंची कामे प्रलंबित असून त्यामध्ये बाबासाहेब मोरे, एस.पी. साळुंके, शोभा धुमाळ, राहुल घुसळे, अशोक शिंदे, मुकेश तळे, अशोक गोरे, संतोष धुमाळ, संतोष त्रिभुवन, रामनाथ बोबडे व राजेश मालसकर यांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments