वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...
वैजापूर, ता.08 - वैजापूर: येथील कांदा मार्केटमधील महिला व्यापारी व पेट्रोलपंप चालकाची 32लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कर्नाटक राज्यातील कांदा व्यापारी विरोधात वैजापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तृप्ती दीपक वावरे (वय 43 वर्ष, रा. विद्यानगर, वैजापूर) या 2023 पासून वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकृत परवान्याअंतर्गत कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांचा व्यवसाय वैजापूरसह नाशिक जिल्हा येथील अंदरसुल परिसरातही सुरू आहे. व्यवसायात त्यांचा मुलगा प्रितेश वावरे मदत करतो तसेच त्यांच्या नावावर वे-ब्रिजही चालवला जातो.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, 25 ऑगस्ट 2025 रोजी मोहम्मद फजल पाशा (बाबा ट्रेडिंग कंपनी, रा. 208 संथेपेटे रोड, चन्नविरप्पा फूट मंडी, मिंजा मोहल्ला, हसन) हा व्यापारी त्यांच्या कांदा खरेदी केंद्रावर आला. सुरुवातीला त्याने नियमितपणे माल खरेदी करून ऑनलाइन व रोख रक्कमेद्वारे पैसे देत विश्वास संपादन केला. यानंतर 25 नोव्हेंबर 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान आरोपीने विविध ट्रकद्वारे एकूण 12,339 क्विंटल कांदा खरेदी करून नेला. या मालाची एकूण किंमत 1 कोटी 64 लाख 49 हजार 509 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आरोपीने काही रक्कम रोख व यूपीआयद्वारे दिली असली तरी 30 लाख 41 हजार 174 रुपये थकवून संपर्क तोडल्याचा आरोप आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, वारंवार फोन करूनही आरोपी टाळाटाळ करत राहिला आणि नंतर त्याचे दोन्ही मोबाईल क्रमांक बंद झाले. दरम्यान, ट्रकांना डिझेल भरताना आरोपीने स्थानिक राधालक्ष्मी एचपी पेट्रोल पंपाचे मालक परेश भोपळे यांचाही विश्वास संपादन करून त्यांच्याकडे 2 लाख रुपये थकवले. अशा प्रकारे महिला व्यापारी व पेट्रोल पंप चालक मिळून एकूण 32 लाख 41 हजार 174 रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेऊन थकीत रक्कम परत मिळवून द्यावी, अशी मागणी पीडितेने पोलिसांकडे केली असून वैजापूर पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
0 Comments