वैजापूर, ता.27 - वैजापूर शहरापासून केवळ चार किमी अंतरावर असलेल्या व मागील तब्बल तीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रोटेगाव येथील औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमआयडीसीने (छ. संभाजीनगर) कंबर कसली असून या कामासाठी तीन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या आहेत. यातील नामफलकाची निविदा पूर्ण झाली असून आखणीसाठी असलेली निविदा लवकरच उघडण्यात येणार आहे तर अंतर्गत रस्ते, गटार, वीज पाणी यासाठी असलेली सर्वात मोठी निविदा मुंबई येथे होईल. आखणीसाठी असलेली निविदा अंतिम झाल्यानंतर कार्यारंभ आदेश होऊन लगेच कामाला सुरुवात होईल अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (२४ मार्च) वैजापूर येथे दिली. यामुळे रोटेगाव येथील औद्योगिक वसाहतीचा मार्ग मोकळा झाला असून उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले...
येथील जे. के. जाधव महाविद्यालयात वैजापूर तालुका इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व माजी उद्योग संचालक डॉ जे. के.जाधव यांनी एमआयडीसी संदर्भात आयोजित केलेल्या खुल्या चर्चासत्रात अधिकाऱ्यांनी सविस्तरपणे विचार मांडले तसेच प्रकल्पबाधित शेतकरी व भावी उद्योजकांच्या प्रश्नांचे समाधान केले.
यावेळी माजी उद्योग संचालक डॉ जे.के.जाधव, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक अतुल पाथरे, सहाय्यक अभियंता (विकास कामे) अजय चन्ने, सहाय्यक क्षेत्र व्यवस्थापक संजय खांडेकर, भुमापक सुदर्शन यवतवाड, प्राचार्य विष्णू भिंगारदेव यांची प्रमुख उपस्थिती होती.
रॊटेगाव येथील एमआयडीसीसाठी जरूळ, आघुर, रोटेगाव व लोणी येथील २६७ शेतकऱ्यांनी 436.18 हेक्टर म्हणजेच एक हजार 160 एकर शेतजमीनी दिल्या असून यातील काही शेतकऱ्यांनी एमआयडीसीकडे प्रति एकर 25 ते 30 लाख रुपयांची मागणी केली आहे. याबाबत शेताकऱ्यांनी दाखल केलेली प्रकरणे तालुका, जिल्हा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत. जरूळमधील तेरा, आघुरमधील अकरा, रोटेगावमधील दोन व लोणी बुद्रुक येथील 29 अशा 55 शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी कोर्टात केस दाखल केल्यामुळे उपलब्ध 436.18 हेक्टरवरील 154 भूखंडापैकी (प्लॉट) 179.99 हेक्टरवरील कामांना अडचण येत आहे. मात्र आता एमआयडीसीने कोर्टाच्या निकालानुसार शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येईल तथापि कामांना गती देण्यासाठी तीन स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. यातील रस्ते कामांची निविदा प्रक्रियेत आहे. 21 भूखंडांचे वाटप झाले आहे. येथील जमिनीचा दर प्रति चौ.मी.एक हजार 430 रुपये म्हणजे 57 लाख रुपये एकर असल्याचे पाथरे यांनी स्पष्ट केले. पाण्यासाठी सर्वेक्षण झाले असून तूर्त विहीर खोदून पाण्याची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लघु उद्योजकांना दोन एकर पर्यंत प्रति चौमी 150 रुपये दराने भूखंड देण्याची मागणी करण्यात आली. तसेच ज्या शेतकऱ्यांना 15 लाख रुपये मोबदला देण्याचा निकाल कोर्टाने दिला आहे. त्यांना मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी डॉ जाधव, अजय चन्ने यांनीही मार्गदर्शन केले. भास्कर मतसागर, रामचंद्र पिलदे, यश शिंदे, जितेंद्र चापानेरकर, शंतनू संतपाळ, विशाल शिंदे आदींसह शेतकरी, उद्योजक उपस्थित होते.
0 Comments