वैजापूर, ता .29 - येथील पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता प्रवीण गायकवाड (वय 35 वर्ष) याला पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा दुसरा हप्ता 75 हजार मंजूर करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) छत्रपती संभाजीनगर पथकाने सोमवारी (ता.29) वैजापूर पंचायत समिती कार्यालयात रंगेहाथ पकडले.
अभियंता प्रवीण गायकवाड
31 वर्षीय तक्रारदाराने दुसऱ्या हप्त्यासाठी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर गायकवाडने स्थळ पाहणी, जिओ-टॅगिंग आणि छायाचित्रे ऑनलाइन अपलोड करून धनादेश काढून देण्यासाठी 1हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर नियोजनबद्ध सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
कारवाई दरम्यान आरोपीकडून 1 हजार रुपये लाचेची रक्कम, 450 रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू आहे. या कारवाईमुळे वैजापूर पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली असून तालुकाभर या घटनेची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रतिभा अबूज करीत आहेत.
0 Comments