agriculture, वैजापूर कांदा मार्केटमध्ये कांद्याला 1400 रुपये भाव ; कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा

वैजापूर, ता.19 / प्रतिनिधी - वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची आवक होत असून उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल 1400 ते 1500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे,  तर कमी प्रतीच्या कांद्याला 800 रुपयांपर्यंत भाव मिळत असून अपेक्षेपेक्षा कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निराशा दिसून येत आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
कांदा दरातील चढ उतार आणि निर्यातीत अनिश्चिततेमुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकरी चिंतेत असून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान द्यावे - आ. रमेश बोरणारे 

कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून सरकारने गुजरात राज्याप्रमाणे कांद्याला प्रतिक्विंटल 200 रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आ. बोरणारे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली.

जून महिन्यात  14 .50 कोटी रुपयांची कांदा खरेदी 

वैजापूरच्या कांदा मार्केटमध्ये 1 जून ते 30 जून 2025 पर्यंत 13 कोटी 45 लाख 72 हजार 681 रुपये किमतीचा 1 लाख 30 हजार 898.39 क्विंटल मोकळा कांदा तर 1 कोटी 38 हजार 439 रुपये किमतीचा 21 हजार 223 गोणी (11 हजार 764.82 क्विंटल) कांद्याची आवक झाली. जून महिन्यात गोणीत आलेल्या कांद्याला जास्तीत जास्त 2 हजार तर कमीत कमी 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. 1 लाख 30 हजार 898.39 क्विंटल मोकळ्या कांद्याची आवक झाली. मोकळ्या कांद्याची किंमत 13 कोटी 45 लाख 72 हजार 681 रुपये आहे. मोकळ्या कांद्याला अधिक भाव 1750 तर कमी भाव 100 रुपये मिळाला. सरासरी 1400 रुपये दर मिळाला.

1 जुलै ते 16 जुलै दरम्यान 88 हजार 510 क्विंटल मोकळ्या कांद्याची आवक झाली.या कांद्याला अधिक दर 1410 ते 1500 रुपये तर कमी दर 200 रुपये मिळाला. सरासरी 850 रुपये दर मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे यांनी दिली.
शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळत असल्याने पुढे कांद्याच्या भावात वाढ होऊन दोन पैसे पदरात पडतील या आशेने शेतकरी आपला चांगला कांदा साठवणूक करून ठेवत आहे. कमी प्रतवारीचा कांदा बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे.

Post a Comment

0 Comments