agriculture, कांदा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक ; वैजापूर बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्यास समितीची टाळाटाळ




वैजापूर, ता 10 / प्रतिनिधी - कांदा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती.या प्रकरणात वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समीती नेमण्यात आली होती.मात्र या समीतीकडून चौकशी करण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे. जवळपास दीड महिना उलटून देखील या समीतीने अद्याप आपला अहवाल सादर केला नसल्याचे दिसून येत आहे.

वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी साई बालाजी ट्रेडींग कंपनीचा मालक सागर राजपूत याने ऑक्टोबर २०२४ मध्ये ३५० कांदा उत्पादक शेतकऱ्यांची २ कोटी १० लाख रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच सहकार विभागाकडे देखील अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.सहकार विभाग व पणन मंडळाने या प्रकरणात बाजार समितीला दोषी ठरवले होते.तसेच शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे २६ मे २०२५ रोजी आमरण उपोषण केले होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
जिल्हा उपनिबंधक यांनी समीती स्थापन करून पंधरा दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते. बाजार समीतीचे संचालक मंडळ स्थापन झाल्यापासून अद्यापपर्यंत चौकशी समीतीला कारवाई करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक यांनी १० मुद्दे दिले असून, मुद्दे निहाय चौकशी करण्यास सुचविले आहे.

तसेच बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीत पथकप्रमुख सहाय्यक निबंधक डी. आर. मातेरे, सहाय्यक निबंधक के. एम. चौधरी, लेखा परीक्षक जे. एच. ठाकूर, फारुख शेख, गणेश सरग यांचा समावेश आहे.
पंधरा दिवसांत या समीतीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र दीड महिना उलटून देखील या समीतीने अद्याप आपला अहवाल सादर केला नाही. त्यामुळे सहकार खाते बाजार समितीच्या संचालक मंडळाला पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
बाजार समीतीने पोटनियमातील तरतुदींचे उल्लंघन केले का ? अटी व शर्ती ची पुर्तता केली का ? बाजार समीतीचे कामकाज व्यापारी तत्त्वावर चालते का? खरेदीदारांच्या दप्तरांची तपासणी केली का ? नियमानुसार फी वसूल केला का ? तसेच फी खात्यावर जमा केली का ? आदी दहा मुद्द्यांची चौकशी पथक करणार आहे.

Post a Comment

0 Comments