जलशुध्दीकरण प्रकल्प व नगरपलिकेसाठी प्रशासकीय इमारतीची मागणी
वैजापूर, ता.10/ प्रतिनिधी - विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आ.रमेश पाटील बोरणारे यांनी बुधवारी (ता.09) वैजापूर शहरातील विविध समस्या व प्रश्न मांडले. नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याची तसेच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घोयगांव साठवण तलावातून येणारे पाणी साठविण्यासाठी तलाव बांधण्याची मागणी केली.
2025-2026 या वर्षीच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करताना आ. बोरणारे म्हणाले की, गेल्या दोन - अडीच वर्षात शासनाने निधी उपलब्ध करुन दिल्याने वैजापूर शहर व तालुक्यातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. परंतु वैजापूर शहराचा पिण्याच्या पाण्याचा व स्वच्छतेचा प्रश्न सुटलेला नाही. नगरपालिकेचे जलशुध्दीकरण केंद्र अनेक दिवसांपासून बिघाड झाल्याने बंद पडले आहे त्यामुळे शहरातील नागरिकांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळत नाही. हा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन जलशुध्दीकरण प्रकल्प व शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी कोपरगांव तालुक्यातील घोयगाव येथून येणारे पाणी साठविण्यासाठी शहरालगत एक तलाव मंजूर करण्यात यावा.
आ. बोरणारे यांनी वैजापूर नगरपालिकेची प्रशासकीय इमारत व शहरातील स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित करून स्वच्छता विभागात कामगारांची भरती करण्यात यावी अशी मागणी केली. पालिकेची प्रशासकीय इमारत व शहरालगत असलेल्या नारंगी मध्यम प्रकल्पाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी मंजुरी देण्यात यावी. त्याचप्रमाणे नगरपालिका क्षेत्रात शासनाच्या विविध योजनातून मंजूर झालेल्या घरांची कामे अर्धवट आहेत ते पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. पालिकेला अग्निशमन दल आहे परंतु मनुष्यबळ नाही त्यासाठी आवश्यक उपाय करण्याची मागणीही आ. बोरणारे यांनी केली.
0 Comments