आ.बोरनारे यांचे पाटबंधारे विभाग व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
वैजापूर, ता.09/ प्रतिनिधी -
नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने तेथील धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हे पाणी जायकवाडी धरणात जात असून जल संपदा विभागाने जायकवाडी धरणातूनही पाणी सोडण्यासाठी सुरुवात केली आहे. धरणातील हे अतिरिक्त (ओव्हरफ्लोचे) पाणी नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यात सोडल्यास वैजापूर गंगापूर मतदार संघातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो म्हणून हे पाणी तातडीने जलदगती कालव्यात सोडावे असे पत्र आमदार रमेश पाटील बोरनारे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. या पत्राची प्रत नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग व नाशिक येथील कडा अर्थात लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासकांनाही पाठवण्यात आली आहे.
तालुक्यातील गंगथडी भागातील नांदूर मधमेश्वर कालवा लाभ क्षेत्रात आतापर्यंत कमी पाऊस झाल्याने भुगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. आणखी काही दिवस पाऊस न पडल्यास दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात कालव्यासाठी असलेल्या धरणातून मोठ्या प्रमाणावर गोदावरीत विसर्ग सुरु आहे. हे पाणी कालव्यात सोडल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल असे पत्रात म्हंटले आहे.
त्याच प्रमाणे वैजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पात आज केवळ दोन टक्के पाणी साठा आहे. या प्रकल्पाच्या अहवालात पन्नास टक्के पाणी हे पालखेड धरणातील ओव्हरफ्लोचे घेण्याची तरतूद आहे. पालखेड,, करंजवन, वाघाड या धरणात पाणी साठा झाला आहे. त्यानुसार ओव्हरफ्लोचे पाणी नारंगीत धरणात सोडावे अशी मागणी आ. रमेश बोरनारे यांनी केली आहे.
0 Comments