वैजापूर, ता.12/प्रतिनिधी -
बँकेची बदनामी ही खोडसाळपणाने करण्यात येत आहे. जो कोणी ही बदनामी करत असेल त्याला वेळ आल्यावर कायदेशीर उत्तर देण्यात येईल तसेच आलेल्या चौकशीला सामोरे जाऊ असे वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब (रविंद्र) संचेती यांनी शुक्रवारी (ता.11) पत्रकारपरिषदेत सांगितले.यावेळी त्यांनी बँकेचा प्रगती अहवाल व वार्षिक ताळेबंदही वाचून दाखविला.
वैजापूर मर्चंट को - ऑपरेटिव्ह बँकेच्या कारभारात गंभीर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याची तक्रार बाजार समितीचे माजी सभापती भगिनाथ मगर यांनी सहकार विभागाकडे केली होती. या तक्रारीवरून सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम (83) अन्वये बँकेच्या चौकशीचे आदेश 20 जून रोजी दिले आहेत. यासंदर्भात बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी शुक्रवारी (ता.11) पत्रकार परिषद घेऊन बँकेत कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. बँकेवर खातेदार, ठेवीदार व सभासद यासर्वांचा विश्वास असून आलेल्या चौकशीला सामोरे जाऊ असे सांगितले.
या पत्रकारपरिषदेत चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी वैजापूर मर्चंट कॉ-ऑप्- बँकेच्या स्थापनेपासून ते आजतागायतची वाटचालीबाबत माहिती देत सांगितले की, सन 1959 मध्ये स्व.बन्सीलालजी संचेती यांनी सतरा हजार रूपयांच्या भागभांडवलासह मर्चंट-कॉ-ऑप् बँकेचे छोटेसे रोपटे लावले. त्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले असून आजमितीस बँकेत एकूण 540 कोटी 26 लक्ष रुपयांच्या ठेवी आहेत. 190 कोटी 30 लक्ष रुपयांची गव्हर्मेंट सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक आहे. 381 कोटी 65 लक्ष रूपये कर्ज वाटप असून एनपीए (90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी परतफेड न झालेले अथवा ज्या कर्जाचे व्याज आणि मुद्दल वेळेवर भरले नाही) मात्र 2.54 (लेखापरिक्षणात 3.96) टक्केच आहे. याशिवाय बँकेला 1 कोटी 64 लाख 55 हजार रुपये इतका निव्वळ नफा झाल्याची माहिती दिली. दरम्यान मागील वीस वर्षांपासून बँकेत निवडणूक न होणे हे बँकेच्या सभासदांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाची पोचपावतीच असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. पत्रकार परिषदेला बँकेचे संचालक उल्हास ठोंबरे, विनोद गायकवाड, प्रशांत त्रिभुवन, प्रशांत सदाफळ, अँड.प्रमोद जगताप मर्चंट बँकेचे वरिष्ठ शाखाधिकारी अशोक कोठारी, बाळासाहेब तांबे आदींची उपस्थिती होती.
जून महिन्यात बँकेचे लेखापरिक्षण.....
वर्षभरात होणाऱ्या शासकीय त्रैमासिक लेखापरिक्षण (Audit) हे जून महिन्यातच झाले असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान लेखापरिक्षण व त्या संबंधीच्या बाबी या एक कायदेशीर व निरंतर चालणाऱ्या बाबी आहेत. मात्र कुणी जर या बाबींचे भांडवल करून खोडसाळपणाने बँकेची बदनामी करत असेल तर वेळ आल्यावर त्यांना नक्कीच कायदेशीर उत्तर देणार असल्याचे संचेती यांनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती यांनी कुणाचेही नाव न घेता 'लोकांनी बाजार समिती हातात असताना स्वतःची मुलं तिथं कामाला लावली.' असे सांगत मात्र आम्ही कुठलीही लालसा न ठेवता 'मर्चंट कॉ-ऑप्' बँकेसारख्या मोठ्या- संस्थेत सर्व घटकातील 240 तरुण नोकरीला लावले. त्यामुळे बँकेचे खातेदार असो अथवा ठेवीदार त्यांचा संचालक मंडळावर पूर्णपणे विश्वास असल्याचे सांगितले.
0 Comments