today news, शिवना टाकळी प्रकल्पाचे हक्काचे पाणी मिळावे - धोंदलगाव परिसरातील शेतकऱ्यांची मागणी



युवासेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल डमाळे यांचे 
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन 

वैजापूर, ता.12 / प्रतिनिधी -
शिवना टाकळी प्रकल्प पूर्ण होऊन तब्बल वीस वर्षे झाली तरी लाभक्षेत्रातील धोंदलगांव व परिसरातील गावांना अद्याप पाणी मिळालेले नाही. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करूनही पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकल्पाच्या अपूर्ण चाऱ्याचे काम व अस्तरीकरण करून येणाऱ्या काळात हक्काचे पाणी आम्हाला मिळवून द्यावे. अशा आशयाचे निवेदन युवासेनेचे जिल्हाप्रमुख विट्ठल पाटील डमाळे यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिले आहे.

युवासेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील डमाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. शिवना टाकळी प्रकल्प 2005 ला पूर्ण होऊन तब्बल वीस वर्षे होऊन गेले. प्रकल्पाच्या 55 किलोमीटर लांबीच्या कॅनालसाठी धोंदलगांवसह पंचक्रोशीतील उंदीरवाडी, संजरपुरवाडी, राहेगांव, अमानतपुरवाडी, परसोडा, करंजगाव, दहेगाव व राहेगव्हाण या गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आली. वीस वर्षे उलटूनही या गावांतील शेतकऱ्यांना अद्याप शिवना टाकळी प्रकल्पाचे पाणी मिळालेले नाही.  मागील महिन्यात तब्बल 42 दिवस या प्रकल्पातून कॅनालला पाणी सुरू होते.130 क्युसेकने हे पाणी सोडण्यात आले होते. कॅनालला सोडलेले पाणी 12 ते 14 दिवसांमध्ये या ठिकाणी पोहोचायला पाहिजे होते. परंतू 42 दिवस कॅनाल चालूनही धोंदलगांव शिवारात पाणी दाखल झाले नाही. कॅनालला सोडण्यात आलेले हे पाणी मुरले कुठे ? असा प्रश्न या भागातील  शेतकऱ्यांना पडला आहे. असे श्री. डमाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments