रिपब्लिकन सेनेचे अधीक्षकांना निवेदन
वैजापूर, ता. 18 / प्रतिनिधी -
वैजापूर शहरात काही दिवसापूर्वी उघडकीस आलेल्या गोल्ड लोन प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप करत रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे.
याबाबत रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी व शहर उपप्रमुख सुनील पांडे यांनी नुकतीच पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणात बँक अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून 5 जुलै रोजी बँकेचा मूल्यवर्धक कमलेश अधिकार याच्यासह तीन जणांवर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सोने तपासणी नंतर तब्बल एक महिन्यानंतर पोलिसात तक्रार दिली. या एफआयआर मधील माहिती ही बनावट व पूर्णपणे खोटी आहे व शासनाची दिशाभूल करणारी आहे असा दावा सेनेने केला आहे.
वैजापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, मोंढा मार्केट शाखेचा मूल्यवर्धक कमलेश अधिकार याने बँक मॅनेजर, गोल्ड लोन अधिकारी व सर्विस मॅनेजर या सर्वांनी मिळून सर्वसामान्य लोकांना फसवत त्यांच्या नावावर कर्ज काढून पैसे काढले व उलट कर्जदारावर गुन्हा दाखल करू अशा धमक्या देऊन कर्जदा्रांकडून पैसे घेऊन हे प्रकरण दाबण्याचा घाट केला होता. परंतु सोने तपसण्याच्या म्हणजे ५ जूनच्या पाच दिवस आधीच ३१ मे रोजी गोल्ड अधिकारी यांनी एका महिला कर्जदाराला बोलावून तुम्ही बँकेत ठेवलेले सोने नकली असून कमलेश फरार झाला आहे त्यामुळे त्याचे पैसे तुला भरावे लागतील असे सांगितले. त्यावर महिला कर्जदाराने पैसे भरण्यास स्पष्ट नकार दिला व कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचा इशारा दिला. याबाबत कर्जदाराने १४ जून रोजी पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार दिली असून अन्य कर्जदारांनीही अशीच तक्रार दिली आहे. महिला कर्जदाराने प्रकरण उघडकीस आणले म्हणून बँक मॅनेजर यांनी खोटी व बनावट तक्रार देऊन एफआयआर मध्ये महिला कर्जदारास मुख्य आरोपी केले व मास्टर माईंड अधिकार यांस क्रमांक तीनचा आरोपी केले असे निवेदनात म्हंटले आहे. पाच जुलै रोजी सोन्याची तपासणी केली तर बँक अधिकाऱ्यांना पाच दिवस आधीच हे सोने नकली असल्याचे कसे कळाले असा सवाल रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
0 Comments