वैजापूर, ता.26/ प्रतिनिधी - डायल 112 ला फेक कॉल करणाऱ्या एकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी ( ता. 26) गुन्हा दाखल करण्यात आला. असलम सुलतान कुरेशी (रा.मुस्तफा पार्क) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार ऋषीकेश पैठणकर हे मंगळवारी सकाळी डायल - 112 प्रणालीला कार्यरत होते. दरम्यान सकाळी सव्वा नऊच्या सुमारास एकाने डायल 112 ला कॉल करून भारत नगर येथे काही व्यक्ती गोमांस विक्री करत असून मदत हवी आहे' असा कॉल केला. यामुळे पैठणकर यांनी कॉल आलेल्या नंबरला पुन्हा संपर्क केला. यावेळी कॉल करणाऱ्या इसमाने 'मी तुम्हाला शहरातील आंबेडकर चौक येथे भेटतो, तुम्ही मला तेथे भेटा' असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जाऊन कॉलर यास प्रत्यक्ष भेटून त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव असलम सुलतान कुरेशी (रा.मुस्तफा पार्क) असे असल्याचे सांगितले. 'तुम्ही शहरातील भारत नगर येथे मस्जीद जवळ जा तेथे गोमांस विक्री चालु आहे. मात्र मी तुमच्या सोबत येणार नाही' असे म्हणून तो तेथून निघून गेला. त्यानंतर अंमलदार ऋषीकेश पैठणकर व इतरांनी भारत नगर येथे जाऊन पाहणी केली असता त्यांना तिथे कुणीही गोमांस विक्री करताना आढळून आले नाही.
याबाबत पोलिसांनी तेथील लोकांना देखील विचारणा केली. परंतु असला काही एक प्रकार घडला नसल्याचे पोलिसांना समजले. कोणतीही अत्यावश्यक परिस्थिती उदभवलेली नसताना सदर कॉलरने पोलिसांना विनाकारण व्यस्त ठेऊन डायल - 112 वर फोन करून खोटी माहीती दिल्याने त्याच्याविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments