news today, चेक बाऊन्स प्रकरणी सहा महिने कैद 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ; वैजापूर न्यायालयाचा निकाल

वैजापूर, ता.17/ प्रतिनिधी - चेक बाऊन्सप्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस.पिसाळ यांच्या न्यायालयाने एकास सहा महिने कैद व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशाल सुभाष कुमावत (रा. लोणी खुर्द) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय कुमावत याने वैजापूर येथील श्री. चिंतामणी नागरी पतसंस्था या संस्थेकडून 2016 मध्ये 50 हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यामुळे पतसंस्थेने कुमावत यांच्याकडे रकमेची मागणी केली.त्यावर कुमावत यांनी 18 सप्टेंबर 2018 रोजी बँक ऑफ इंडिया शाखा शिऊर बंगला शाखेचा 42 हजार रुपयांचा धनादेश पतसंस्थेला दिला. हा धनादेश पतसंस्थेने वटवाण्यासाठी बँकेत सादर केला. परंतु रकमेअभावी तो वटला नाही. त्यानंतर पतसंस्थेने आरोपीला वकिलामार्फत नोटीस पाठवून धनादेश अनादरीत रक्कम देण्यास सांगितले. परंतु आरोपीने नोटीस मिळुनही धनादेशाची रक्कम मुदतीत जमा न केल्यामुळे पतसंस्थेने विशाल कुमावत याच्याविरुद्ध वैजापूर येथील न्यायालयात ॲड. निखिल आर हरिदास यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. 
न्यायालयाने फिर्याद, सबळ साक्षी पुरावा व वकिलाचा युक्तीवाद लक्षात घेऊन आरोपीस सहा महिने साधी कैद व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. संस्थेतर्फे दिलीप घाटे यांनी काम पहिले. त्यांना ॲड.अफसर पठाण, सोहेल पटेल, हर्षल आव्हाळे व मानसी दंडारे यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments