कोल्हापूर, ता.17- सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक आराधे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. यानंतर मान्यवरांनी सर्किट बेंच इमारत परिसराची पाहणी केली. राज्य शासनाच्या वतीने सीपीआरच्या समोरील या सर्किट बेंच इमारतीसाठी ४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांतील नागरिकांना जलद आणि सुलभ न्याय मिळेल. नागरिकांचा वेळ, श्रम व पैशांची बचत होईल. कायद्याचे अभ्यासक, वकिल व विद्यार्थ्यांना नवनवीन संधी उपलब्ध होतील.
कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments