वैजापूर तालुक्यातील नादी शिवारात गोकुळ पाटील डहाके यांच्या शेतात मादी बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
वैजापूर, ता .13/ प्रतिनिधी - वैजापूर तालुक्यातील नादी शिवारातीलगट क्रमांक 30 मध्ये एका तलावाच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या शेताजवळ मंगळवारी सकाळी मादी बिबट्यासह पिलांचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. त्यांनी वनविभागाला कळवून नागरिक व पाळीव जनावरांच्या रक्षणासाठी पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान, नादी ग्रामपंचायतीने यावर्षी 26 जानेवारी रोजी घेतलेल्या विशेष ग्रामसभेत अल्ताफ लतीफ पठाण यांच्या सूचनेनुसार व त्यांना सद्दाम गुलाब पठाण यांनी अनुमोदन दिल्यानुसार जीवित हानी होऊ नये म्हणून जंगली जनवारांपासून संरक्षण मिळण्याची मागणी वन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नादी शिवारात ऊसाच्या शेतात या मादी बिबट्याचे वास्तव्य असून या ठिकाणी दोन ते तीन पिल्ले ग्रामस्थांना आढळून आली आहेत. त्यामुळे या परिसरात घबराट पसरली आहे. तालुक्याच्या डोंगरथडी भागात मोठया प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने या भागात वन्य प्राण्यांचा नेहमी वावर असतो. मात्र मागील काही दिवसांपासून तालुक्यात गोदावरी नदीच्या काठी असलेल्या प्रदेशात ऊस व मकाची लागवड वाढली आहे. त्यामुळे या भागातही मोठ्या प्रमाणावर हिंस्त्र प्राण्यांचा वावर वाढला असून नागरिक असुरक्षित झाले आहेत. बिबट्यासह रान डुकरांचाही शेतकऱ्यांना त्रास असल्याचे एका शेतकऱ्याने सांगितले. दरम्यान वनविभागाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनरक्षक ए. एम. सय्यद यांनी वन परीक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट दिली. नागरिकांनी या भागात गर्दी करू नये, रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, सोबत टॉर्च बाळगावी, लहान मुलांना बाहेर पडू देऊ नये, त्यांच्या सोबत राहावे, रात्री उघड्यावर झोपू नये अशा सूचना वन विभागाने केल्या आहेत.
0 Comments