वैजापूर, ता.12/ प्रतिनिधी - भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा भाजपची कार्यकारिणी जाहीर केली असून या कार्यकारिणीवर वैजापूर तालुक्याचा वरचष्मा दिसून येत आहे. जाहीर करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीत चार जिल्हा उपाध्यक्ष, एक सरचिटणीस, दोन सचिव, सहकार आघाडी जिल्हा संघटक, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष या पदांवर वैजापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची वर्णी लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत हे विशेष.
शिवसेना (उबाठा) पक्ष सोडून भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले माजी जिल्हा परिषद सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल पैठणपगारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे या चार जणांची वैजापूर तालुक्यातून भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी नगरसेवक दशरथ बनकर यांना कायम ठेवण्यात आले असून जिल्हा दूध संघाचे संचालक कचरू पाटील डिके यांना सहकार आघाडीच्या जिल्हा संघटकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदावर जयमालाताई वाघ यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे. तर ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर आदमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. मंजाहरी पाटील गाढे व प्रभाकर बारसे यांची जिल्हा सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी, वैजापूर मर्चंट बँकेचे चेअरमन बाळासाहेब संचेती, भाजपचे तालुकाध्यक्ष नारायण पाटील कवडे, सुरेश राऊत, कैलास पवार, दामोदर पारीख, दिनेश राजपूत, शैलेश पोंदे, गौरव दोडे, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, प्रेम राजपूत आदींनी अभिनंदन केले. सर्व नवनियुक्त पदाधिकारी भाजपची विचारधारा अधिक बळकट करतील. गावागावात पक्षाची उपस्थिती वाढवून, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करून आणि लोकाभिमुख उपक्रम राबवून पक्षाच्या विजयी रथाला गती देतील.अशी अपेक्षा डॉ.दिनेश परदेशी यांनी व्यक्त केली.
0 Comments