मन्याड साठवण तलावात 100 टक्के, कोल्ही मध्यम प्रकल्पात 73.64 टक्के, नारंगी धरणात 9.81 टक्के पाणीसाठा उपलब्ध तर बोर दहेगाव प्रकल्प कोरडाठाक
जफर ए. खान
------------------------
वैजापूर, ता.17- -- वैजापूर शहर व तालुक्यातील विविध भागांमध्ये अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी व शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. शिऊर भागातील गारज व लोणी मंडळात मुसळधार पाऊस झाला असून या परिसरातील कोल्ही मध्यम प्रकल्पात 73.64 टक्के तर मन्याड साठवण तलाव 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. आहे. शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात 88.32 टक्के जलसाठा असून या प्रकल्पातून विसर्ग सुरु आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्याने बोर दहेगांव मध्यम प्रकल्प कोरडेठाक असून, शहरालगतच्या नारंगी धरणातही केवळ 9.81 टक्के पाणीसाठा आहे.
लोणी - चिकटगांव रस्त्यावर नाल्याला आलेल्या पुरामुळे नागरीकांना असा दोर लावून धोकादायक प्रवास करावा लागला.
मागील काही आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. ऐन बहारात आलेली खरीप पिके पावसाभावी सुकून जाण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस होत असल्याने खरीप पिकांसह कांदा व कपाशी पिकांना जीवदान मिळाले असून
शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
वैजापूर शहरालगतच्या नारंगी धरणात केवळ 9.81 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे
तालुक्यातील शिऊर भागात मुसळधार पाऊस झाला असून या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले. शिऊर शिवारातील भाऊसाहेब परसराम जाधव यांच्या शेतात पाणी साचले.
तर लोणी ते चिकटगांव रस्त्यावर नाल्याला आलेल्या पुरामुळे या मार्गावर वाहतूक खोळंबली. शनिवारी देखील पावसाने सर्वदूर हजेरी लावली. रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता.
मन्याड साठवण तलाव 100 टक्के भरले असून या भागातील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.
0 Comments