news today, वैजापूर शहरातील आदिवासी भिल्ल समाजाला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्या - राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

पालिका मुख्याधिकारी बी.यू.बिघोत यांच्याकडून तत्काळ दखल   भिल्ल वसाहतीत स्वच्छता मोहीम 

वैजापूर, ता .23 / प्रतिनिधी - वैजापूर शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात चाऊस कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या वसाहतीत गेल्या कित्येक वर्षांपासून नागरी सुविधांचा अभाव आहे. नाले व जल निस्सारणाची व्यवस्था नाही, रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून स्वच्छतेच्या अभावामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात तर ही परीस्थिती अधिकच बिकट होते. पावसाचे पाणी निचऱ्याची सोय नसल्याने वसाहतीत पाणी तुंबून राहते, ज्यामुळे डास, कीटक व अन्य रोगराई वाढून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक या अस्वच्छतेमुळे सतत आजारी पडत असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 

पालिका अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर चाऊस 

भिल्ल समाज हा नगर परिषदेच्या मूलभूत सुविधापासून वंचित आहे. या वसाहतीतील त्रस्त महिला व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष जुबेर चाऊस यांची भेट घेतली.जुबेर चाऊस यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आदिवासी वसाहतीला भेट दिली असता वास्तव समोर आले. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी नगर परिषदेत जाऊन प्रशासनासमोर सर्व समस्या मांडल्या. नगर परिषदेने तातडीने या वसाहतीत जल निस्सारण व्यवस्था, रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम, नियमित स्वच्छता मोहीम, वीज पुरावठा व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी जुबेर चाऊस यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.


आदिवासी भिल्ल वसाहतीत तुंबलेले पावसाचे पाणी
व घाण उचलण्यासाठी पालिकेची तात्काळ कारवाई 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष जुबेर चाऊस यांनी दिलेल्या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन पालिकेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी आदिवासी भिल्ल वसाहतीत स्वच्छता मोहीम राबविण्याचे  स्वच्छता विभागाला आदेश दिले. त्यानुसार स्वच्छता विभागालचे प्रमुख प्रमोद निकाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर चाऊस यांनी आदिवासी भिल्ल समाज वसाहतीत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर स्वच्छता विभागाने या वसाहतीत स्वच्छता मोहीम राबवून वसाहतीत तुंबलेले पाणी काढले तसेच बुजलेली गटारे मोकळी करून परिसरातील घाण स्वच्छ केली. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जुबेर चाऊस यांनी यांनी उपस्थित राहून स्वच्छता विभागाकडून काम करून घेतले.




Post a Comment

0 Comments