news today, वैजापूर तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लावणार - आ. बोरणारे

धोंदलगाव येथे शिवना टाकळी प्रकल्पासंदर्भात आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत आ.बोरणारे यांची ग्वाही 

प्रभाकर जाधव 
--------------------------
गारज दि. 23 - तालुक्यातील रस्त्यांची कामे मार्गी लावली असून पुढील काळामध्ये वैजापूर तालुका सुजलाम व सुफलाम करण्यासाठी तालुक्यातील सिंचन प्रश्न मार्गी लावण्यावर भर देणार असल्याची ग्वाही आ. रमेश पाटील बोरणारे यांनी शनिवारी (ता.23) धोंदलगाव येथे शिवना टाकळी प्रकल्पासंदर्भात आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत दिली.

या बैठकीस माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर , पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे, तहसीलदार सुनील सावंत, कार्यकारी अभियंता उमेश वानखेडे , उपअभियंता मोहम्मद अशपाक, बाजार समितीचे सभापती रामहरी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ , युवासेना जिल्हाधिकारी भरत कदम, भाजपचे कल्याण पाटील दांगोडे, उपतालुकाप्रमुख पंढरीनाथ कदम,  सजनराव शिंदे, उद्धव उगले, प्रशांत शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

बैठकीत शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे उर्वरित काम आणि भूसंपादित जमिनीचा मोबदला यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. प्रकल्पांतर्गत भूसंपादित झालेल्या जमिनींचा मोबदला तातडीने मिळावा तसेच ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र अल्प प्रमाणात संपादित झाले आहे, त्याची अचूक मोजणी करण्यात यावी याबाबत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी पोहोचवण्यासाठी प्रकल्पातील उर्वरित पाट दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आ. बोरणारे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यावरील चारीचे बाकी काम त्वरीत पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या गेल्या व त्या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण होईल असे आश्वासन देण्यात आले. 

शिवना टाकळी मध्यम प्रकल्प हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी जोडलेला महत्त्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पाचे पाणी बोर दहेगाव प्रकल्पात लवकरात लवकर कसे येईल याबाबत जो कोणी शासकीय गुत्तेदार असेल त्यानी हे काम गुणवत्तापूर्ण करावे असे निर्देश आ.बोरणारे यांनी बैठकीत दिले. ही बैठक प्रकल्पाच्या गतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. या बैठकीत सिंचनाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यात शिवना टाकळी प्रकल्पाचे पाणी बोर दहेगाव धरणात आणणे, उजव्या कालव्याची गळती थांबवणे, मायनरसह पोट चाऱ्याची दुरुस्ती करणे, संपादित जमीनीचा शेतकऱ्यांना मावेजा देणे या बाबींचा समावेश होता.

तालुक्यातील रस्त्यांची कामे व रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमाफी हे प्रश्न मार्गी 

यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आ.बोरणारे म्हणाले की, मागील पंचवार्षिकमध्ये तालुक्यात असलेले खराब रस्ते पूर्णपणे चांगले करून संपूर्ण तालुक्यातील दळणवळण व्यवस्था सुरळीत केली असून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेतील 14 गावांतील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावला आहे. तर या पंचवार्षिकमध्ये संपूर्ण तालुका सिंचनमय करून शेतकरी सुजलाम सुफलाम करण्याचा मानस मी ठेवला आहे. नारंगी मध्यम प्रकल्पात पालखेडचे तर बोर दहेगाव प्रकल्पात शिवना टाकळीचे पाणी आणणे, चांदेश्वरी व मन्याड प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावणे ही सिंचनाची कामे आपण हाती  घेतले आहे.

या बैठकीस सरपंच भारत आवारे, वसंत डमाळे, वसंत वाघ , रावसाहेब वाघ, कैलास आवारे, काकासाहेब कुभांडे, सुरेश पानसरे, सरपंच नितीन साळुंखे, चंद्रकांत पवार, नरेंद्र सरोवर, सरपंच संतोष सरोवर, किरण सरोवर, राधाची सरोवर, बाळासाहेब चेळेकर, सरपंच राजू छानवाल, सरपंच सुदाम गोरे , ज्ञानेश्वर जाधव, अण्णा डमाळे , पुंडलिक तुपे, राहुल शेळके, सुभाष तांबे यांच्यासह धोंदलगाव, दहेगाव, गारज, परसोडा, नालेगाव, मनुर, पाथरी, बायगाव, खिरडी, भायगाव गंगा, उंदिरवाडी, पोखरी, झोलेगाव, जांबरखेडा परिसरातील शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रभाकर जाधव यांनी केले तर आभार सुभाष तांबे यांनी मानले.











Post a Comment

0 Comments